Pune: गणेशभक्तांसाठी पुण्यातून विमानसेवा

पुणे – पुण्यातून कोकणात जाण्यासाठी दि. ३१ आॅगस्टपासून विमानसेवा सुरू होत आहे. पुणे-गोवा आणि पुणे-सिंधुदुर्ग या दोन मार्गांवर थेट विमानसेवा सुरू होत असल्यामुळे यंदा लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी पुण्यातील कोकणवासियांना विमानाने जाता येणार आहे.
फ्लाय ९१ विमान कंपनीकडून या दोन्ही मार्गांवर शनिवार आणि रविवारी ही विमानसेवा सुरू असणार आहे. त्यामुळे आता अवघ्या तासाभरात पुण्यातून कोकणात पोहचता येणार आहे. त्यामध्ये पुणे-सिंधूदुर्ग-पुणे या विमान सेवेत फ्लाइट क्रमांक आयसी ५३०२ हे विमान पुणे विमानतळावरून सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी सुटेल. ते नऊ वाजून दहा मिनिटांनी सिंधूदुर्ग विमानतळावर पोहोचेल. तर, फ्लाइट क्रमांक आयसी ५३०३ हे विमान सिंधूदुर्ग ते पुणे हे विमान सिंधूदुर्ग येथून सकाळी साडेनऊ वाजता सुटेल. ते पुण्यात सकाळी दहा वाजून ३५ मिनिटांनी दाखल होईल.
पुणे-गोवा-पुणे मार्गावर फ्लाइट क्रमांक आयसी १३७६ हे सकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुटेल. ते पुण्यात सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. तर, फ्लाइट क्रमांक आयसी १३७५ हे सकाळी दहा वाजून ५५ मिनिटांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुटेल. ते गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल.





