“कमांड हॉस्पिटलमध्ये पाच हजार बेडची सुविधा’ ही अफवाच

विश्‍वास ठेवू नका : संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे – कमांड हॉस्पिटलमध्ये 5000 बेड असून, तेथे करोना रुग्णांना दाखल करता येईल, अशी पोस्ट काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ती अफवा असल्याचे संरक्षण खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. “पुणे येथे कमांड हॉस्पिटल मोफत उपचार देत आहे.

आर्मी हॉस्पिटलने पुणे येथील लोकांसाठी पाच हजार बेड उपलब्ध करून दिले आहेत. कृपया अमूक…अमूक नंबरवर कॉल करा. केवळ आधार कार्ड आवश्‍यक. पकोणी बेड शोधत असतील तर ही पोस्ट सर्व ठिकाणी शेअर करा म्हणजे याचा लाभ गरजूंना होईल.’ अशी पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे.

वास्तविक अशी कोणतीही उपचारासाठी थेट दाखल करून घेण्याची सोय कमांड हॉस्पिटलमध्ये करण्यात आली नाही. मुळात संरक्षण विभागाने किंवा कमांड हॉस्पिटलने हे निवेदन जारी केलेलेच नाही. या व्हायरल पोस्टमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, या पोस्टचा दाखला देऊन, उपचार मिळतील या आशेने अनेक बाधितांना त्यांचे नातेवाईक येथे उपचारासाठी घेऊन येत आहेत.

मात्र, या ठिकाणी रुग्णाला आधार कार्डच्या आधारे थेट दाखल करता येत नाही. येथे तीन माध्यमांतून उपचारासाठी दाखल करता येऊ शकणार आहे. यामध्ये महापालिकेचे आरोग्यप्रमुख (हेल्थ ऑफिसर) किंवा महापालिकेचा आपत्कालिन विभाग (डिझास्टर मॅनेजमेंट सेल) किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांची शिफारस लागते. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच येथे उपचारासाठी दाखल करता येते, असे संरक्षण विभागातील जनसंपर्क प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वरील प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या व्हायरल मेसेजवर विश्‍वास ठेवू नका असे आवाहनही लष्कर प्रशासनाने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.