Pune : ज्याचा पहिला अर्ज त्याची पहिली मोजणी

पुणे : जमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर वशिलेबाजीने प्राधान्यक्रम डावलून काहींना लवकर मोजणीची तारीख दिली जाते, तर काहींची मोजणी महिनोनमहिने ताटकळून पडते. असे प्रकार टाळण्यासाठी जमिन मोजणीच्या प्रक्रियेमधील मानवी हस्तक्षेप दूर करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने ई मोजणी २.० ही नवीन प्रणाली आणली आहे. यामध्ये फिफो अर्थात (फस्ट इन फस्ट आऊट) म्हणजेच जमिन मोजणीचा अर्ज ज्या क्रमाने येणार त्याच क्रमाने मोजणीसुध्दा केली जाणार आहे. त्यामुळे जमिन मोजणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, वशिलेबाजीला लगाम बसणार आहे.
भूमि अभिलेख विभागाकडून जमिनीची हद्दकायम, पोटहिस्सा, बिनशेती, कोर्टवाटप, कोर्टकमिशन व विविध प्र्कल्पांकरीता भूमि संपादन आदींसाठी मोजणीचे काम केले जाते. ई-मोजणी २.० या नवीन प्रणालीमध्ये जमिन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात या प्रणालीचा वापर सुरु असून, त्यानुसारच मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. यामध्ये जमीनधारक स्वत:च मोजणीसाठी अॉनलाइन पध्दतीने अर्ज भरतात. तसेच मोजणेची फी सुध्दा आॉनलाइन भरता येते. मोजणी अर्जाबाबतची सद्यस्थिती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळते. जमीन मोजणीच्या नकाशाची प्रत सुध्दा अॉनलाइन मिळत आहे.
मोजणीसाठी बऱ्याच वेळा वशिलेबाजीने मोजणीची तारीख लवकर दिली जाते. त्यामुळे प्रामाणिकपणे मोजणीसाठी वाट पाहणाऱ्या नागरिकांवर अन्याय होतो. पहिल्या टप्प्यात प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार मोजणी प्रकरणे निकाली काढण्यात येत होती. मात्र शासकीय मोजणी, भूसंपादन या प्रकरणांमध्ये या मोजणीस विलंब होत होता. त्यामुळे मागील महिनाभरापासून यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र या प्रणालीमध्ये मोजणीची वर्गवारी करून शासकीय मोजणी व्यतिरिक्त इतर सर्व येणारे मोजणी अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार मोजणी करून निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
मानवी चुका टळणार
या संगणक प्रणालीदवारे स्विकारण्यात येणाऱ्या मोजणी अर्जानंतर जमीनीची मोजणी जीआयएस आधारीत रोव्हर्स द्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक हद्दीचे अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहेत. त्यामुळे जमिन मोजणी प्रकरणांमध्ये लगतच्या धारकांचे हद्दीबाबत मोजणीवेळी लगत गटांमधे एकमेकांच्या हद्दी जाणे अथवा दोन मोजणीमुळे हद्दीमध्ये अंतर पडणे यासारखे मानवी चुकांमुळे होणारे वाद, तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे.





