पुणे – उंड्री येथील जगदंब भवन मार्गावरील मार्वल आयडियल सोसायटीच्या चौदा मजली इमारतीत गुरुवारी सायंकाळी बाराव्या मजल्यावरील एका सदनिकेत भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून पाच अग्निशमन वाहने व एक उंच शिडीचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे दोन जवान व तीन नागरिक जखमी झाले असून, १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या आग नियंत्रणात आली असून दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस व महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.