Pune : सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये आर्थिक गैरव्यवहार

पुणे : सिंहगड संस्थेतील एका कर्मचाऱ्याने नुकतेच वेतन न मिळाल्याने आत्महत्या केली असून आणखी काही कर्मचारी आत्महत्येचा इशारा देत आहेत. ही गंभीर बाब असून सिंहगड इन्स्टिट्यूटमधील आर्थिक गैरव्यवहारातील चौकशी करण्याची मागणी करीत ट्रस्टी स्नेहल नवले यांनी पत्रकार परिषदेत मारुती नवले यांच्यावर थेट आरोप केले. संस्थेच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार झाला असून या प्रकरणात तपास यंत्रणांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर ट्रस्टी स्नेहल नवले यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. संस्थेच्या स्थापनेपासून सुखदेव नवले हे उपाध्यक्ष होते. २०१६–१७ मध्ये त्यांना अल्झायमर झाल्याने ते अकार्यक्षम झाले. २०२३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्याच काळात अध्यक्ष मारुती नवले यांनी संस्थेचा संपूर्ण कारभार आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप स्नेहल नवले यांनी केला. संस्थेतील निधी आनंद सहकारी बँकेतून इतर खासगी खात्यांमध्ये वळवण्यात आला. ही खाती मारुती नवले व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर होती, असेही त्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांचा पगार तातडीने द्यावा : सध्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे पगार थकले असून, महापालिकेचे करही भरले गेलेले नाहीत. हे सर्व तातडीने भरावे, अशीही मागणी त्यांनी केली. मारुती नवले आणि आम्ही वेगळे आहोत. संस्थेचा कारभार पारदर्शकपणे व्हावा, ही आमची इच्छा आहे, असे सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.





