अंजली दमानिया यांची मागणी पुणे – मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी केली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांची भेट घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, या प्रकरणाची सर्व कागदपत्रे पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखेला दिली असून टप्प्याटप्प्याने पोलीस होत आहे. अद्याप ठोस कारवाई होत नाही. या प्रकरणी एकच एफआयआर, तपास अधिकारी हवा. अन्यथा तपासाची दिशा भरकटू शकते. खारगे समितीसमोर दिग्विजय पाटील हजर झाले नाहीत, तर पार्थ पवार कधी हजर होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दिग्विजय पाटील यांची चौकशी ही केवळ औपचारिक असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास लोक प्रकरण विसरतील, अशी सत्ताधाऱ्यांची अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए अमेडियाच्या लोकांशी सातत्याने संपर्कात होता आणि जागा खरेदीवेळी अजित पवार यांना सर्व बाबी माहिती होत्या, असा दावाही त्यांनी केला. सिंचन घोटाळ्याचे सर्व पुरावे देऊनही अजित पवार यांच्यावर कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्यासोबत शपथ घेणे ही बाब चुकीची असल्याचेही मत दमानिया यांनी व्यक्त केले. शीतल तेजवानीच्या अनेक याचिकांमुळे खरी चौकशी होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.