पुणे – गेल्या २४ तासांत किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील थंडीचा पारा ७ अंशावरून ९ अंशावर गेला. परिणामी थंडीचा कडाका काहीसा कमी झाला. शहराच्या मध्यवर्ती भागासह कोरेगांव पार्क, मगरपट्टा, हडपसर आणि विश्रांतवाडी परिसरातील हुडहुडी कमी झाली. एनडीए, पाषाण, वारजे, कात्रज, खडकवासला, धायरी, आंबेगाव, हांडेवाडी परिसरात थंडीचा जोर कायम आहे. मंगळवारी (दि. १६) पाषाण परिसरात सर्वात कमी ९ अंश सेल्सिअस किमान तापामानाची नोंद झाली. बारामती, शिवाजीनगर परिसरातील पारा ९ अंशापर्यंत आला होता. अन्य परिसरात किमान तापमान १० ते १२ अंशाच्या पुढे नोंदविले गेले. मागील दोन आठवड्यापासून शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान ७ अंशापर्यंत खाली आल्यामुळे थंडीचा जोर वाढला. विशेषत: शहरातील पाषाण, हवेली, एनडीए परिसरासह जिल्ह्यातील बारामती, माळीण या जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीने नागरिक गारठले. मागील दोन ते तीन दिवसांत किमान तापमान अर्धा ते एक अंशाने कमी-अधिक होत होते. गेल्या २४ तासात किमान तापमानात वाढ झाल्यामुळे ७ अंशापर्यंत खाली आलेले किमान तापमान ९ अंशाच्या पुढे नोंदविले. परिणामी थंडीचा जोर कमी झाला असून, हुडहुडीपासून दिलासा मिळाला आहे. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील, तर किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, थंडीचा जोर असाच राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. आजचे तापमान पाषाण ९, कोरेगाव पार्क १३.७, चिंचवड १५.५, वडगावशेरी १५.७, मगरपट्टा १५.८, बारामती-शिवाजीनगर ९.४, दौंड १०, शिरूर १०.४, तळेगाव १०.७, आंबेगाव ११.१, माळीण १२.८, भोर १४.८ अंश सेल्सिअस