पुणे : शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोकण यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या प्रवाशांना एसटीचा प्रवास सुखकर आणि वातानुकुलीत व्हावा यासाठी पुणे एसटी विभागाकडून दि. १५ एप्रिलपासून टप्याटप्याने जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. पुण्यात नोकरी, शिक्षण किंवा व्यावसायानिमित्त आलेले कुटुंबिय शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या सुरू होताच गावी किंवा पर्यटनासाठी बाहेगावी जाण्याचे नियोजन करतात, यासाठी महिन्याभरापासूनच रेल्वे, एसटी यासह खासगी बसचे सीट आरक्षित केले जाते. मात्र, ज्या कुटुंबियांचे नोकरीच्या ठिकाणी सुट्ट्या किंवा अन्य कारणांमुळे चार ते आठ दिवस आधी बाहेरगावी जायचे नियोजन होते, अशावेळी रेल्वेचे बुकिंग फुल असते, तसेच एसटीलाही प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, तत्काळ बससेवा उपलब्ध व्हावी यासाठी पुणे एसटी विभागाकडून दि. १५ एप्रिल ते १५ जून दरम्यान जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या जादा बस टप्याटप्याने सोडण्यात येणार आहेत. नियमीत आणि जादा बसेसचे आरक्षण विभागातील सर्व आगार व बसस्थानकातील आरक्षण कक्षात उपलब्ध आहे. तसेच ऑनलाइन तिकिटही काढता येणार असून प्रवाशांनी सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे. मात्र यंदा परिक्षा एप्रिल अखेरपर्यंत… दरवर्षी शाळांच्या परिक्षा दि. १० ते १२ एप्रिलपर्यंत संपतात, त्यानंतर नागरिकांचे बाहेरगावी जाण्याचे नियोजन होते. मात्र, यंदा परिक्षांचे वेळापत्रक बदलले आणि दि. २५ एप्रिलपर्यंत परिक्षा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट आहे, त्यामुळे आगारात प्रवाशांची गर्दी २५ एप्रिलनंतर वाढण्याची शक्यता आहे. जवळपास ३०० ते ५०० जादा बसचे नियोजन स्वारगेट आगारातून बोरिवली, ठाणे, दादर, सोलापूर, कोल्हापूर, कल्याण, पंढरपूर, पुणे स्टेशन आगारातून दादर तर शिवाजीनगर आगारातून औरंगाबाद, नाशिक, लातूर, धुळे, अकोला, सोलापूर, भिमाशंकर, बोरीवली या मार्गावर नियमित बस धावतात. दरवर्षी, उन्हाळ्यामध्ये किमान ४०० जादा बस फेऱ्यांचे नियोजन केले जाते. त्यानुसार यंदाही प्रवाशांच्या गर्दीनुसार जादा बस सोडण्यात येणार आहे. या आगारातून पुढील मार्गावर जादा बस सोडण्यात येणार स्वारगेट : तुळजापूर, सोलापूर, नाशिक शिवाजीनगर : लातूर, धुळे, बीड, वाशीम, चाळीसगांव भोर : नाशिक आणि सोलापूर नारायणगांव : नाशिक आणि संगमनेर राजगुरूनगर : नाशिक, बीड, त्र्यंबकेश्वर तळेगाव : सोलापूर, लातूर, अकोला, मुक्ताईनगर, तासगाव शिरूर : छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर बारामती : लातूर, परळी, सोलापूर, इंदापूर : बीड, सोलापूर, लातूर, अक्कलकोट, कोल्हापूर सासवड : सोलापूर, पंढरपूर, आदमापूर दौंड : बारामती, जळगांव, बीड, पिंपरी-चिंचवड : चिपळूण, एमआयडीसी : अहिल्यानगर, सातारा, गोंदवले मंचर : छत्रपती संभाजीनगर, अक्कलकोट