PUNE: इंधनासाठी हायड्रोजनची प्रायोगिक तत्वावर निर्मिती

पुणे – भविष्यातील इंधन म्हणून केंद्र आणि राज्यशासनाकडून हायड्रोजन निर्मितीसाठी पुढाकार घेत धोरणे जाहीर करण्यात आलेली आहेत. त्यातच आता महापालिकाही शहरात निर्माण होणाऱ्या विघटनशील आणि अविघटशील कचऱ्यापासून लवकरच जैविक इंधनाचा नवीन पर्याय असलेल्या हायड्रोजन वायूची निर्मिती करणार आहे.
प्रायोगिक तत्वावर दैनंदिन १० टन कचर्यावर प्रक्रिया करून ०.६ टन हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर रामटेकडी येथे उभारण्यात येणार आहे. तसेच, या प्रकल्पात होणारी हायड्रोजन निमिर्ती तसेच प्रकल्पाचे आर्थिक स्थैर्य लक्षात घेऊन ३५० टन क्षमतेच्या प्रकल्पास मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
याबाबत, गुरुवारी महापालिकेत गुरूवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुमार खेमनार यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पास येणारा खर्च तसेच अनुदानाबाबत निर्णय होत नसल्याने हा प्रकल्प रेंगाळला होता. मात्र, पालिकेने पुढाकार घेत या प्रकल्पास गती दिली आहे. वेरियट पुणे वेस्ट टू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून रामटेकडी येथील महापालिकेच्या जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
पीएमपी ठरविणार प्रकल्पाचे भवितव्य
प्रायोगिक तत्वावर तयार होणारा हायड्रोजन पीएमपी बससाठी इंधन म्हणून वापरला जाणार आहे. एआरएआयकडून पीएमपी बसेससाठी हायड्रोजन वापरासाठीचे तंत्रद्यान उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे रामटेकडी येथील प्रकल्पात तयार होणारा हायड्रोजन पीएमपीसाठी दिला जाणार असून, त्याच्या वापराने इंधनाची किती बचत होईल, खर्च कसा वाचेल याची माहिती घेतली जाणार आहे. या माहितीच्या आधारावरच महापालिकेकडून दुसर्या टप्प्याच्या प्रकल्पास निधी तसेच अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे डाॅ. खेमनार यांनी सांंगितले.





