Pune : प्रेमात सर्वकाही माफ असतं…पण, कायद्यात नसतं

पुणे : प्रेमात सर्वकाही माफ असतं, ना वयाच बंधन ना कोणत माप असतं, असे म्हटलं जाते. मात्र, प्रेमात कायद्याच्या दुष्टीने वयाच बंधन महत्वाचे असते, कायद्यात काहीही माफ नसतं, अशीच एक घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
भारती विद्यापीठ पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्याचा उलगडा करीत मुलीला पालकांच्या स्वाधीन केले. मात्र, ही अपहरणाची कहाणी लहानवयातील आकर्षणातून सुरू झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका १७ वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. या मुलीचे कुटूंब पुणे जिल्हयातील सधन कुटूंब आहे. त्यांची मुलगी पुणे शहरात एका बड्या शिक्षण संस्थेत संगणक पदविकेचे शिक्षण घेते. अपहरणाची तक्रार प्राप्त होताचा शोधाशोध करीत मुलीला जालना येथील घणसांगवी गावातून सुखरुप ताब्यात घेण्यात आले.
प्रकरणाच्या चौकशीत पोलिसांना कळाले की, मुलगी नववीमध्ये असताना त्यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी जालना येथून मजुरांच्या टोळ्या आल्या होत्या त्यातील एका वीस वर्षीय ट्रॅक्टर चालकाशी मुलीचे तेंव्हा सुत जुळले. टोळी निघुन गेल्यानंतरही हा मुलगा दोन-चार दिवसांनी त्यांच्या घरी राहून गेला. नंतर मुलीकडील मोबाइलमध्ये मुलाचा नंबर सापडला. घरच्यानी मुलीला धाकदपटशहा करीत मुलापासून तोडले होते. मात्र, लहानपणीचे प्रेम मुलीच्या मनात घर करुन होते. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तीने पुन्हा मुलाशी संपर्क साधला. त्यानंतर मुलगा पुण्यात येऊन तीला जालन्याला घेऊन गेला. यामुळे मुलीच्या घरामध्ये मोठा कोलाहाल माजला. मुलीचे आजोबा लष्करातून निवृत्त आहे, तर त्यांच्या दुसऱ्या मुलाचा मुलगा पैलवान संघटनेता देश पातळीवरील मोठा पदाधिकारी आहे. घराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने सर्वस्तरावरुन मुलीच्या शोधासाठी दबाव होता. पोलिसांना मुलाचे लोकेशन भेटले. मात्र , त्याला पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागली. पोलिसांनी अखेर मुलाच्या चुलत्याला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीला गावात सोडून मुलगा पळून गेला.
पोलिसांनी मुलीला तीचे शैक्षणीक करिअर, कुटूंबाची प्रतिष्ठा आणि घरच्यांच्या प्रेमाची जाणीव करुन दिली. तोवर मुलीला मुलाच्या घरची आर्थिक परस्थिती कळाली होती, त्याचे पडझड आलेले घर, मद्यपी वडील आणि दुर्गम भाग हे पाहून तीनेही पुन्हा घरी फिरण्याची मानसिक तयारी केली. परंतु, या दरम्यान मुलाने जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवल्याचे तीने सांगितले. यामुळे अपहरणाच्या गुन्ह्याबरोबरच मुलगी अल्पवयीन असल्याने पॉस्कोचे कलमही वाढविण्यात आले. पोलीस मुलाचा शोध घेत आहेत. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम आणि अंमलदार प्रदीप चव्हाण यांनी केली.





