पुणे – कारवाईनंतरही दुचाकीचालकांवर जरब नाही

पुणे – शहर वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, याचा नागरिकांवर कोणताही परिणाम होताना दिसून येत नसून यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबतीत वारंवार कारवाई करून देखील “नियमभंग’ करणाऱ्यांचे प्रमाण “जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे.

1 जानेवारी 2019 पासून हेल्मेट वापराबाबत सक्‍ती करण्यात आली होती. जानेवारी ते मार्च या केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांकडून लाखो वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. हेल्मेट न घातल्यास वाहनचालकाला 500 रुपयांचा दंड आकारण्यात येतो.

वाहतुकीचे नियमभंग केल्याने दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येते. यामध्ये “हेल्मेट नसणे’, “झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबवणे’, “सिग्नल तोडणे’ आदी गोष्टींसंदर्भात कारवाई केली जाते. वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्यांची “टॉप 100’ची यादीही तयार केली आहे. अशा बेशिस्तांना पोलिसांकडून नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. तरीही परिस्थितीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे.

दि. 1 मार्च ते 31 मार्च
एकूण चलन – 1 लाख 70 हजार 347
आकारण्यात आलेला एकूण दंड – 8 कोटी 51 लाख 73 हजार 500 रूपये

वाहतूक पोलिसांच्या वतीने नागरिकांना अनेक माध्यमातून वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येते. नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षिततेचा विचार करून हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे.
– पंकज देशमुख, उपायुक्त, वाहतूक

Leave A Reply

Your email address will not be published.