पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्यावरुन सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनावर धारेवर धरले. तब्बल पाच वर्षे झाली, तरी विद्यार्थ्यांना डुप्लिकेट मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याची माहिती उदाहरणासह सदस्यांनी अधिसभेत विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. या सर्व प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सदस्यांनी केली. पाच-पाच वर्षे प्रमाणपत्र मिळत नाही, ही गंभीर बाब आहे. याबाबत दिलगिरी व्यक्त करीत येत्या १५ दिवसांत मार्कलिस्ट दिले जाणार असल्याचे आश्वासन कुलगुरू डाॅ. सुरेश गोसावी यांनी दिले. विद्यापीठाची अधिसभेची बैठक शनिवारी सुरू झाली. यात प्रश्नोत्तरामध्ये अधिसभा सदस्य गणपत नांगरे यांनी दुबार गुपत्रक विद्यार्थ्यांना किती दिवसांत दिले जाते, असा प्रश्न उपस्थित केला. त्यास व्यवस्थापन सदस्य सागर वैद्य यांनी हे गुणपत्रक जास्तीत जास्त १५ दिवसांत दिले जातात, असे सांगितले. त्याच दरम्यान नांगरे यांनी एका विद्यार्थिनीनी डुप्लिकेट मार्कलिस्टसाठी अर्ज करून पाच वर्षे झाले, अजूनही मार्कलिस्ट मिळालेले नाही, याकडे सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर अन्य सदस्यांनी वेळेत कोणतेच प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळत नसल्याची तक्रारी मांडल्या. वेळेत प्रमाणपत्र न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. कुलगुरूंकडून दिलगिरी…. विद्यार्थ्यास पाच वर्षानंतर प्रमाणपत्र मिळत नाही, यावरुन विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यास अधिसभा संपेपूर्वी डुप्लिकेट मार्कलिस्ट द्यावी, अशी मागणी सचिन गोर्डे-पाटील यांनी केली. कुलगुरुंना सर्व अधिकार असतानाही मार्कलिस्ट देण्यास अडचण काय, असा प्रश्नही त्यांनी मांडला. सदस्यांची आक्रमक भूमिका लक्षात घेता या सर्व प्रकाराबद्दल कुलगुरू डाॅ. गोसावी यांनी दिलगिरी व्यक्त केली. प्रभारींचा कालावधी अनिश्चित… डाॅ. सुनील लोखंडे यांनी विद्यापीठात किती अधिकारी प्रभारी म्हणून व केव्हापासून काम करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. त्यास प्राचार्य देविदास वायदंडे यांनी विद्यापीठात ११ पदे ही प्रभारी अधिकारी असल्याचे नमूद केले. मात्र कुणाकडे किती काळ प्रभारी पद असायला हवे, याविषयी नियमावलीचा मुद्दा मांडला. त्यास विद्यापीठाकडून काहीच उत्तर मिळाले नाही. पूर्णवेळ प्राध्यापक भरती झाल्यानंतर प्रभारी अधिकाराचा कार्यभार संपुष्टात येईल, असे सांगून आश्वस्त केले.