पुणे : मेव्हणीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध करणाऱ्या इस्टेट एजंटचा शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास खून करण्यात आला. ही घटना गुजरवाडी रस्त्यावरील पवारनगर येथे घडली. याप्रकरणी चुलता आणि पुतण्याला अटक करण्यात आली आहे. मनोहर दिनकर शिंदे (४६, रा. पवारनगर, गुजरवाडी रोड, मांगडेवाडी, कात्रज) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (३२) आणि केशव मोतीराम आसोरे (२६, दोघे रा. खोपडेनगर, गुजर निंबाळकरवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या मेव्हणीचे आरोपी रोहितबरोबर अनैतिक संबंध होते. रोहित हा पूर्वी रिक्षा चालवायचा, नंतर त्याने टुरिस्टचा व्यवसाय सुरू केला होता. मनोहर यांचा दोघांच्याही अनैतिक संबंधांना विरोध होता. यामुळे त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री रोहितने त्याच्या दोन-तीन मित्रांना घेऊन मनोहरला पवारनगर येथे गाठले. तेथे ज्ञानदा अपार्टमेंटच्या समोर लाथा-बुक्क्यांनी आणि बांबुने मारहाण केली. बांबूचा वार डोक्यावर वर्मी लागल्याने मनोहरचा मृत्यू झाला. घटना कळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यांनी आरोपींच्या मागावर दोन पथके रवाना केली. यातील मुख्य आरोपी रोहितला पुण्यातून तर केशवला बीड येथील गेवराई येथून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.