18 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल : “डीटीई’चे संचालकांची दिली माहिती
पुणे – इयत्ता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष इंजिनिअरिंग पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) जाहीर केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या 18 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल, अशी माहिती “डीटीई’चे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली आहे.
राज्यात दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया निकाल लागण्यापूर्वी जाहीर केली आहे. दहावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्याला डिप्लोमाला प्रवेश घेता येईल. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना 30 मे ते 18 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. या कालावधीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे आणि दाखले अपलोड करायचे आहेत. या प्रक्रियेनंतर 19 जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीबाबत काही आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांनी 20 आणि 21 जून रोजी सुविधा केंद्रात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी 24 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
“कॅप’च्या पहिल्या फेरीला 24 जून रोजी सुरुवात होईल. या दिवशी राज्यात डिप्लोमा प्रवेशासाठी उपलब्ध असणाऱ्या एकूण जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना 25 ते 28 जून या कालावधीत कॉलेजांचे पर्याय भरायचे आहेत आणि ते निश्चित करायचे आहेत. पहिल्या फेरीसाठी एक जुलै रोजी कॉलेज ऍलॉटमेंट यादी जाहीर होईल. यादीनुसार, विद्यार्थ्यांना दोन ते पाच जुलैदरम्यान “एआरसी’ केंद्रावर जाऊन प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना दोन ते सहा जुलैदरम्यान ऍलॉट झालेल्या कॉलेजांमध्ये जाऊन कागदपत्रांसह शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. “कॅप’च्या दुसऱ्या फेरीला आठ जुलै रोजी सुरुवात होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक आणि माहिती डीटीईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दरम्यान, विद्यार्थ्याला पर्यायानुसार पहिल्या क्रमांकावरील कॉलेज मिळाल्यास त्याला त्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेणे अनिवार्य राहणार आहे. संबंधित विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्यास त्याला पुढच्या “कॅप’ फेऱ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार नाही. तसेच, पर्यायामध्ये पहिल्या क्रमांकाचे कॉलेज मिळून संबंधित विद्यार्थ्याने “सेल्फ फ्रीज’ पर्याय निवडल्यास त्यालादेखील पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पहिल्या पर्यायाव्यतिरिक्त इतर कॉलेज मिळाल्यास आणि त्या विद्यार्थ्याला चांगले कॉलेज हवे असेल, तर त्याने एआरसी सेंटरवर जाऊन “बेटरमेंट’चा पर्याय निवडावा.
प्रवेशासाठी संकेतस्थळ : http://poly19.dtemaharashtra.org/diploma19/
अर्जासाठी शुल्क
खुल्या गटातील विद्यार्थी, परराज्यातील विद्यार्थी : 400
महाराष्ट्रातील राखीव प्रवर्गातील विद्यार्थी : 300