धनकवडी – धनकवडी, सहकारनगर परिसरात गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी प्रचंड अतिक्रमणे वाढली होती. यासंदर्भात क्षेत्रीय कार्यालयाकडे नागरिकांकडून तक्रारी देण्यात आल्या होत्या. परंतु, कारवाई होत नव्हती. मात्र, तक्रारींचे वाढते प्रमाण पाहता पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत मोठी कारवाई केली. यावेळी रस्ते, पदपथ आणि इमारतींच्या मार्जिनमधील अनेक अनधिकृत बांधकामे हटवली. सिंहगड कॅम्पस परिसर, सरहद चौक, सुभाष टेरेस आणि त्रिमूर्ती चौक यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारी आणि या भागातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. बांधकाम विकास विभाग (झोन क्र. २) आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाने एकत्रीत ही कारवाई केली. या कारवाईमध्ये सुमारे ५ हजार ३०० चौरस फूट जागेवरील फ्रंट मार्जिन व साइड मार्जिन अतिक्रमणे जमिनी दोस्त केली. तसेच, ३ लोखंडी स्टॉल्स, एक हातगाडी, ३७ काउंटर्स, २ सिलिंडर्स, ५ टेंट्स आणि १९ शेड्स व झोपड्या जप्त करण्यात आल्या. हे सर्व साहित्य १० ट्रकमध्ये भरून नेण्यात आले. अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे आणि उपायुक्त विजयकुमार थोरात (परिमंडळ क्र. ३) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या सहायक आयुक्त सुरेखा भनगे, अतिक्रमण निरीक्षक सागर विभुते यांच्यासह किरण नवले, प्रथमेश पाटील, अतुल ब्राम्हणकार, हणमंत काटकर, योगेश कोत्तावाड, अविष्कार दवणे, आयुब शेख, वैभव जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ३ पोलीस आणि ४ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात होते. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भविष्यातही अनधिकृत बांधकामांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहणार आहे.