पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पाच दिवसांत 32 हजार 687 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्याची सुविधा संकेतस्थळावर 27 मेपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा भाग-2 विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. प्रवेशाच्या माहिती पुस्तिकाही विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमधून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. शाळा व मार्गदर्शन केंद्रांच्या स्तरावरुन विद्यार्थ्यांच्या अडचणीही सोडविण्यात येऊ लागल्या आहेत.
आतापर्यंत ऑनलाइन दाखल झालेल्या अर्जांपैकी 6 हजार 500 अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. 13 हजार 62 अर्जांची स्वयंचलित पडताळणी करण्यात आली आहे. अद्यापही 13 हजार 125 अर्जांची पडताळणी होणे शिल्लक आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्ष मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.
नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद विभागात अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नाही. ती लवकरच सुरु होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात एकूण 21 हजार 806 अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 1 हजार 775 अर्जांची पडताळणी झाली आहे. 11 हजार 689 अर्जांची संगणक प्रणालीद्वारे आपोआपाच पडताळणी करण्यात आलेली आहे. 8 हजार 342 अर्जांची अद्यापही तपासणी पूर्ण झालेली नाही.