Pune : निवडणूक आली, गेली; समस्या वर्षानुवर्षे कायम

फुलेनगर- नागपूर चाळ परिसरातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित
येरवडा – फुलेनगर- नागपूर चाळ या प्रभाग क्र. २ मध्ये झोपडपट्टी आणि सोसायट्यांसह सरकारी कार्यालये, येरवडा कारागृह आणि प्रादेशिक मनोरुग्णालयाचा भाग येतो. तुरुंग आणि मनोरुग्णालय वसाहतीचा समावेश या प्रभागात होतो. प्रभागात कमी दाबाने होणारा पिण्याचा पाणीपुरवठा, सतत खंडित होणारी वीज, अस्वच्छ शौचालये, रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणे वर्षानुवर्षे कायम आहेत.
महापालिका निवडणुका आल्या आणि गेल्या. मात्रा, या समस्या मात्र सुटलेल्या नाहीत. नागपूर चाळ, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, पंचशीलनगर, प्रतीकनगर, माजी सैनिकनगर, हिरामण मोझेनगर, श्रमिकनगर, एकतानगर, टिंगरेनगर, विद्यानगर, कस्तुरबा सोसायटी, चव्हाण चाळ, शांतीनगर, मोहनगर, इंदिरानगर, फुलेनगर, हरीगंगा, राम सोसायटी, डाॅ. आंबेडकर सोसायटी, अहिल्या सोसायटीचा समावेश या प्रभागात होतो.
मुळा नदीमुळे नदीकाठ परिसरातील झोपड्यामध्ये प्रभागात पुराचे पाणी शिरते. यातून अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. दरवर्षी या लोकांना नव्या घराबाबतचे आश्वासन मिळते. मात्र, आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनुत्तरीत आहे. मुलांना खेळायला क्रीडांगणे नाहीत.
मनोरुग्णालयाचे मैदान आहे. मात्र, त्यावर झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. निवडणुकीवेळी हा मुद्दा कायम अग्रस्थानी असतो. आळंदी रस्त्यासह विश्रांतवाडी चौक, टिंगरेनगर, हुतात्मा उद्यान, वाल्मिक उद्यान, टिंगरेनगर, काॅमर्स झोन, आयटी पार्क, आरटीओ कार्यालय, बदाम चौक या भागातील बेकायदा टपऱ्या हा कळीचा मुद्दा आहे. अतिक्रमणावर अनेक जण बेकायदा वसुली करतात. या मुख्य रस्त्याशेजारील शासकीय जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. म्हाडाच्या घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सरकारी वसाहती असल्याने त्यांना सुविधा देताना महापालिकेची दमछाक होते. प्रभागात भाजी मंडई, पार्किंगसाठी वाहनतळची सोयच नाही. मुख्य रस्त्यालगत वाहने उभी केली जात असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत.
अशी आहे राजकीय स्थिती…
महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षाही या वेळची निवडणूक चुरशीची होणार आहे. अनेक माजी नगरसेवकांसह नव्या इच्छुकांनी दंड थोपटले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाची विभागणी झाल्यानंतर कोणता उमेदवार कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळवेल, हे अखरेच्या क्षणी कळणार आहे.
या प्रभाग क्र. २ हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. मुस्लिम आणि अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांची संख्या येथे मोठी आहे. प्रिझन प्रेस आणि नागपूर चाळ फुलेनगर असा एक प्रभाग २०१७ च्या पालिका निवडणुकीत केला गेला. यामध्ये भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची युती होती. प्रभागात भाजपचे डाॅ. सिद्धार्थ धेंडे अनुसूचित जाती प्रवर्गातून, तर ऍड. फरजाना शेख ओबीसी, शीतल सावंत सर्वसाधारण महिला, तर राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे सर्वसाधारण पुरुष गटातून निवडणूक जिंकले होते. या वेळी भाजपला नवीन चेहऱ्याला संधी द्यावी लागणार आहे.
भाजपमधून निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांचे बंधू सुहास टिंगरे हे इच्छुक आहेत. आरक्षण सोडतीनंतर अनुसूचित जाती प्रवर्गात महिला उमेदवारासाठी आरक्षण झाल्याने डाॅ. धेंडे यांची अडचण झाली आहे. त्यांना आता सर्वसाधारण गटातून किंवा घरातील महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून नवे चेहरे महापालिकेच्या सभागृहात जाणार, हे निश्चित आहे. त्यामुळे या गटातून इच्छुक असलेल्या सर्व पुरुष उमेदवारांनी आता घरातील महिला सद्स्याचा चेहरा पुढे केला आहे.
प्रचारातील मुद्दे
१) विश्रांतवाडी भाजी मंडई
२) म्हाडा पुनर्विकासाचा प्रश्न
३) मुस्लिम, ख्रिचन दफनभूमीचा प्रश्न
४) नदीकाठी दरवर्षी घरात शिरणारे पुराचे पाणी
हे आहेत इच्छुक उमेदवार…
भाजप : मंगेश गोळे, सुभाष चव्हाण, रूपाली चव्हाण, राजकुमार बाफना, चंद्रकांत जंजिरे, राहुल जाधव, श्यामा जाधव, अदिती बाबर, कविता सचिन धिवार.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस : सुहास टिंगरे, शीतल सावंत, विनोद पवार, कमल अशोक पाटील (साळवे), सिद्धार्थ कांबळे, यशा बल्लाळ, महेश पाटील, किशोर भोंडे, फैय्याज पाशा, ऍड. नाना नलावडे, सुनील गोगले, रिना सहोदे, मतीन खान, अजहर खान, डाॅ. योगेश कदम, भाग्यश्री कदम, वर्षा जाधव, मोना कामटे-गोगले, उमर सय्यद, भाग्यश्री दलाल-कदम, डॉ. योगेश कदम.
काँग्रेस : डाॅ. पार्वती साठे, डॅनियल मगर, सचिन भोसले, शिवानी माने, अमजद मगदूम, वैशाली हिरे.
मनसे : दीपाली शिर्के, कुलदीप घोडके.
वंचित आघाडी : उमेश साळवी, अरुणा साळवी, अभिजीत खत्री.
इतर : सुधीर वाघमोडे, नंदा कांबळे, ऍड. रेणुका चलवादी-शिर्के, डाॅ. सिद्धार्थ धेंडे, ऍड आयुब शेख, आम्रपाली धिवार.
प्रभागात ५०९ ते विश्रांतवाडी हा रस्त्यावर मोठी ड्रेनेज लाइन टाकून रस्ता सिमेंट काँक्रीटचा केला. युवकांना स्कील डेव्हलपमेंसाठी लाइट हाउस उभारले. न्याती सोसायटीजवळ पाण्याची टाकी उभी केल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. त्याचप्रमाणे उद्यान, ड्रेनेज लाइन बदलण्याचे काम प्रभागात मोठ्या प्रमाणात केले.
– सुनील टिंगरे, माजी आमदार
प्रभागातील पाम उद्यानाची निर्मिती केली. नानासाहेब परुळेकर शाळेजवळ पाण्याची टाकी उभारली, तसेच समाजमंदिरे उभारली. पायाभूत सुविधा उभारल्या.
– शीतल सावंत, माजी नगरसेविका
अग्रसेन शाळा ते काॅमर्स झोन रस्ता केला. काॅमर्स झोन रस्त्यावर पाणी साचत होते. त्यासाठी मोठ्या व्यासाची लाइन टाकुन प्रश्न कायमचा सोडविला. पालिकेच्या शाळेचा पट वाढविण्यासाठी उपक्रम राबवून भाऊसाहेब जाधव शाळेचा मुख्यमंत्री शाळा प्रथम क्रमांक प्राप्त झाला. हाउसिंग बोर्ड येथे छत्रपती शिवराय दवाखान्यात प्रसूतिगृहाची सोय, पंचशीलनगर येथे घरकुल योजना राबविली.
– डाॅ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक
संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेत खेळाचे मैदान उभारले. काॅम्युटर सेंटरचे उभारणी, नानासाहेब परुळेकर शाळेत मुलींच्या कार्यक्रमासाठी मंडप उभारून दिला. पुरामुळे नुकसानग्रस्त कुटुंबीयांना मोफत घरगुती साहित्य दिले. ओपन जिमची उभारणी व पंचशीलनगर येथील विहार नूतनीकरण केले.
– ऍड. फरजाना शेख, माजी नगरसेविका
विकासाची जी कामे झाली, ती पालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे झाली होती. शांतीनगर भागातील अनेक घरे दरवर्षी पुराच्या पाण्याखाली जातात. त्यावर कोणताही ठोस उपाय केला नाही. अनेक कामे कागदावरच झाली. प्रभागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत.
– मंगेश गोळे, भाजप, प्रवक्ते



