प्रभात वृत्तसेवा पुणे – नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची यांसह 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 सदस्यपदांच्या जागांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी झालेले मतदान व उद्या होणाऱ्या मतदानाची मतमोजणी रविवारी, 21 डिसेंबर रोजी होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबरला राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने संबंधित ठिकाणी सुधारित कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आला. अध्यक्षपदासंदर्भातील अपिलांचा निकाल उशिरा आलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुधारीत कार्यक्रमानुसार राबविली गेली. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी उद्या मतदान होणार आहे. सर्व संबंधित ठिकाणी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.