Pune: सायबर भामट्यांकडून ज्येष्ठ दाम्पत्य होम अरेस्ट

पुणे – सायबर भामट्याने एका ज्येष्ठ दाम्पत्यास व्हिडिओ कॉलच्या निगराणीखाली ठेवत तब्बल साडेनऊ लाखाचा गंडा घातला. त्यांना मोबाइलचा व्हिडिओ कॉल चालू ठेऊन मोबाइल खोलीमध्ये अशा ठिकाणी ठेवण्यास सांगितला, जेणेकरुन त्यांच्या सर्व हालचाली सायबर भामट्याला दिसतील, त्यांना एक प्रकारे होम अरेस्ट करण्यात आले. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहित अशी की, ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक पत्नीसह कोथरुड येथे रहातात, त्यांचा मुलग अमेरिकेला स्थायिक झाला आहे. मुंबईतून फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचा कॉल आला, त्याने फिर्यादीला सांगितले की, तुमच्या नावाचे मुंबई -थायलंड असे पार्सल जात असून त्यामध्ये १५० ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ सापडला आहे. हा कॉल मुंबई सायबर सेलला वर्ग करण्यात आल्याचे भासवले. समोरील व्यक्तीने पोलीस उपनिरीक्षक राणा बोलत असल्याचे सांगून चौकशीकामी तुम्हाला व्हॉटसअप कॉल येईल, असे सांगितले.
त्यानंतर व्हॉटसअप कॉल करणाऱ्याने पोलिसांचा गणवेश घालून फिर्यादीशी संवाद साधला. तुमचा मोबाइल मनी लॉंड्रिंग, सक्सटॉर्शन, ह्युमन ट्रॅफिकिंगसाठी वापरला गेल्याचे सांगून होम अरेस्ट करण्यात येत असून घराबाहेर साध्या वेशातील दोन पोलीस पहारा देत आहेत, तुमचा मोबाइल घरात असा ठेवा की, व्हिडिओ कॉलमधून तुमच्या सर्व हालचाली दिसतील, असे सांगितले. त्यानूसार फिर्यादीने मोबाईल हॉलमध्ये सुरु करुन ठेवला. दुसऱ्या दिवशी मुंबईतून पोलीस उपायुक्त बोलत असल्याचे सांगत बॅंक खात्यातील रकमेची माहिती घेत ते सर्व रक्कम दिलेल्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली.
मोठी रक्कम वर्ग झाल्याचा मेसेज फिर्यादीच्या मुलाच्या मोबाइलवर आल्याने त्याने फोन करुन फिर्यादीला विचारणा केली. मात्र, फिर्यादीने सायबर भामट्यांना घाबरुन एक सिक्रेट ॲग्रीमेट केल्याची थाप मुलाला मारली. मात्र, मुलाच्या मनात शंकेची पाल चुकचुकल्याने त्याने पुण्यातील नातेवाईकांना फिर्यादीच्या घरी जाऊन खातरजमा करण्यास सांगितले. दरम्यान फिर्यादीचे नातेवाईक घरी आल्यावर त्यांना हकीकत कळाली. त्यांनी फिर्यादीला समजावून सांगितल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. दरम्यान, हे दाम्पत्य सलग पाच दिवस मोबाइलवरील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सायबर भामट्यांच्या नजरेखाली वावरत होते.





