Pune : शैक्षणिक कर्जाचा हप्ता थकला; बाउन्सरचा घरात घुसून राडा!

पुणे : मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा एक हप्ता थकल्याने कंपनीच्या व्यवस्थापकाने त्यांच्या घरी पाठविलेल्या बाऊन्सरनी बेकादेशीरपणे घरात शिरुन दोघांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आकाश पुरुषोत्तम सापा (३२, रा. भवानी पेठ), ऋषिकेश नागनाथ चंदनशिवे (२६ , रा. जनता वसाहत, पर्वती) आणि फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक हर्षद जिमन या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सापावर यापुर्वी खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वानवडीतील शांतीनगरमध्ये राहणाऱ्या एका ४६ वर्षाच्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने शिवाजीनगर येथील एका फायनान्स कंपनी मधून मुलीच्या शिक्षणासाठी ७ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांना १८ हजार ७० रुपयांचा हप्ता ठरवण्यात आला होता. त्यांनी २४ हप्ते नियमितपणे भरले. मात्र त्यांच्या १७ वर्षाच्या भाचाचा अपघात झाला आणि त्याला औषधोपचाराची गरज असल्याने त्यांना दोन मार्चचा हप्ता भरता आला नव्हता. त्यामुळे २५ मार्च पासून त्यांना मोबाईलवर फोन करून शिवीगाळ करत धमक्या दिल्या जात होत्या.
या प्रकारानंतर त्यांनी स्वत: २६ मार्च रोजी फायनान्स कंपनीच्या वाकडेवाडी कार्यालयात जाऊन हप्ता भरण्यास विलंब झाल्यामागील कारण सांगितले. तेव्हा तेथील रिकव्हरी व्यवस्थापकाने त्यांना ४ ते ५ दिवसांची मुदत दिली. असे असतानाही दुसऱ्याच दिवशी सायंकाळी ते व त्यांचे भाऊ घरात असताना दोघे जण घरात घुसले आणि त्यांनी आम्ही फायनान्सकडून आलो, असे सांगत दमदाटी सुरू केली. त्यांच्याकडे ओळखपत्राची मगणी केली असता, त्यांनी ‘आम्हाला तू कोण विचाणार’, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यावे फिर्यादीने आपले साहेबांशी बोलणे झाले आहे. तीन चार दिवसात राहिलेला हप्ता भरणार असल्याचे सांगितले; मात्र या बाऊन्सरनी ‘हप्ता भरता येत नसेल तर लोन कशाला काढता’, असे म्हणत पुन्हा शिवीगाळ केली आणि फिर्यादी व त्यांच्या भावाला हाताने मारहाण केली.
हा प्रकार घडत असताना फिर्यादींनी या दोघांना घरातून बाहेर व्हा, असे म्हणताच, ‘आम्ही हप्ता घेतल्याशिवाय जाणार नाही’, असे म्हणत घरात बसून राहिले. शेवटी फिर्यादींनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिस आले व त्यांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी व्यवस्थापक हर्षद याच्या सांगण्यावरुन घरी आल्याचे सांगितले.





