शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन एकबोटे यांचे प्रतिपादन पुणे – शिक्षणामुळे केवळ स्वतःमध्ये नाही तर समाज आणि देशामध्येही बदल घडून येण्यास मदत होते. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले तर समाज परिवर्तन होणार नाही. शिक्षण हे परिवर्तनाचे मोठे साधन आहे, त्यामुळे शिक्षणाला कायमच विशेष महत्त्व असायला हवे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत आबासाहेब अत्रे पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांना तर इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील निवृत्त शिक्षक संजय भैलुमे तसेच कर्णबधिर मुलांच्या शिक्षिका विनया देसाई यांना डॉ. एकबोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव प्रफुल्ल निकम, डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनचे मानद अध्यक्ष अशोक वळसंगकर होते. पुरस्कार संयोजन समिती प्रमुख प्रसाद भडसावळे, डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. यांची उपस्थिती होती. डॉ. एकबोटे म्हणाले की, आबासाहेब अत्रे हे माझ्या वडिलांचे जवळचे मित्र होते. त्यामुळे त्या काळात प्रतिकूल परिस्थितीत आबासाहेबांनी ही शाळा उभी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय कष्ट घेतले ते मी जवळून पाहिले आहेत, अशा व्यक्तींमुळेच शिक्षणाचे महत्त्व टिकून आहे. आपला देश हा राजकारण्यांमुळे चालत नाही, तर समाजात विविध क्षेत्रात मनापासून काम करणाऱ्या व्यक्तींमुळे हा देश चालत आहे. डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले की, सध्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट झाली आहे. पूर्वीच्या काळातील शिक्षण आणि आताचे शिक्षण यामध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. शिक्षणाशिवाय देश, समाज मोठा होऊ शकत नाही, त्यामुळे शिक्षणावर विश्वास ठेवायलाच हवा.