पुणे – ‘ई-बस’ ठरतेय फायद्याचीच!

इंधन खर्चात बचत : बिलाची जबाबदारी पालिकेवर


25 बससाठी आला अवघा 8 लाखांचा वीज खर्च


25 डिझेल बसेससाठी 37 ते 38 लाख रुपये खर्च


उद्‌घाटनाच्या पहिल्या महिन्यातच आकडेवारी स्पष्ट

पुणे – पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या ई-बसच्या किंमतीमुळे या बसेसबाबत टीक होत असली, तरी या बसेस विजेवर चालणाऱ्या असल्याने पीएमपीच्या डिझेलच्या खर्चात लक्षणीय बचत होत असल्याचे समोर आले आहे.

पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या 25 बसेसला एका महिन्यासाठी अवघा 8 लाख रुपयांचा वीज खर्च आला आहे. त्याच वेळी डिझेलवर चालणाऱ्या 25 बसेससाठी तब्बल प्रतिमहिना 37 ते 38 लाख रुपये खर्च येत आहे.

शहरातील पर्यावरण संवर्धनासह, पीएमपीची संचलन तूट कमी करण्याच्या उद्देशाने पीएमपीसाठी ई-बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यातील सुमारे 25 बसेस 8 फेब्रुवारीपासून पुणेकरांच्या सेवेत दाखल झालेल्या असून या बसेससाठी भेकराईनगर आणि निगडी येथे चार्जिंग स्टेशन उभारली आहेत. या बसेस सार्वजनिक सेवेसाठी असल्याने या बसेसला महावितरणकडून प्रतियुनिट 5 रुपये 62 पैसे दर निश्‍चित केला असून रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत या बसेस चार्जिंग केल्यास या दरात आणखी दीड रुपयांची सवलत आहे. त्यामुळे मागील महिन्यात या बसेसच्या चार्जिंगपोटी भेकराई नगर येथील स्टेशनला 15 बसेससाठी 5 लाख, तर निगडी येथील स्टेशनला 10 बसेससाठी 3 लाख रुपयांचा खर्च आला असल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. ही वीजबिल भरण्याची जबाबदारी महापालिकेवर असणार आहे.

असे आहे इंधन गणित
पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या सध्याच्या डिझेल बसला प्रति 3 किलोमीटरसाठी 1 लिटर डिझेलची आवश्‍यकता भासते. तर या बसेस दरदिवशी सरासरी 200 ते 210 किलोमीटरच धावतात. त्यामुळे त्यांना दिवसभरासाठी प्रतिलिटर 70 रुपयांप्रमाणे 4,900 ते 5 हजार रुपयांचे डिझेल लागते. मात्र, त्याच वेळी या बसेससाठी प्रतिदिन सरासरी 950 ते 1 हजार रुपयांचा वीज खर्च आहे. त्यामुळे इंधनखर्चात पीएमपीला मोठा दिलासा मिळत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.