खडकवासला (पुणे) – सिंहगडाचे पायथ्याशी आतकरवाडी घेरा सिंहगड मधील एका जेष्ठ नागरिकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आज (रविवारी) स्थानिक नागरिकांना स्मशानभूमी नसल्याने रस्त्यावर वाहणारे पाऊसाचे पाणी ओसरण्यासाठी तब्बल तीन तास प्रेत घेऊन ताटकळत थांबावे लागले. पाऊस विश्रांती घेत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी भर पाऊसातच तात्पुरता पत्र्याचा आसरा उभारून स्थानिक आदिवासी जेष्ठ नागरिकावर मुसळधार पाऊसात अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडल्याने राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा पर्दाफाश झाला. ऐतिहासिक किल्ले सिंहगडाचे पायथ्याशी आतकरवाडी मध्ये आज रविवारी डोकं सुन्न करणारं हे भयावह चित्र पहायला मिळाले..येथील एका ज्येष्ठ नागरिकाचे निधन झाले होते. संबंधित नागरिकाचे अंत्यसंस्कार गावात हक्काची स्मशानभूमी नसल्याने रस्त्यातच करावे लागणार होते मात्र आज दुपारपासून सिंहगड खोऱ्यात जोरदार पाऊस पडत होता.स्मशानभूमीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे पाणी वाहत असल्याने ग्रामस्थ पाऊस थांबण्याची वाट पाहत थांबले होते. तब्बल तीन तास अंत्यविधी लांबला मात्र पाऊस काही थांबत नव्हता त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी भर पावसातच चितेवर आसरा म्हणून लाकडी खांब उभे करून त्यावर पत्रे टाकुन अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.अंत्यविधीप्रसंगी पंचक्रोशीतील शेकडो नागरिक व नातेवाईक उपस्थित होते.मुसळधार पावसातच या मृत व्यक्तीवर अंत्यविधी होत होता .पुणे शहराच्या अगदी जवळ असलेल्या गावातले हे वास्तव चित्र राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या कारभाराचे वाघाडे काढणारेच होते . घेरा सिंहगड मध्ये आठ ते दहा लहान मोठी गावे असून बहुतांश गावात अद्यापही स्मशानभूमीची सोय नाही. येथील ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी हक्काची जागाच नसल्याने येथे राज्य सरकार व जिल्हा परिषदेमार्फत स्मशानभूमी उभारल्या गेल्या नाहीत.त्यामुळे येथे अनेक ठिकाणी रस्त्यातच अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले जातात. ग्रुप ग्रामपंचायत घेरा सिंहगडला चार महसुली गावे असून देखील गावठाणच नाही.गावठाण मागणीचे प्रस्ताव राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे पाच सात वर्षापासून धूळखात पडलेले आहेत. आज रविवार असल्याने आतकरवाडी सिंहगड पायथ्याशी वाहनांची मोठी वर्दळ होती. पीएमपीएमएल व इतर वाहने अधीक असल्याने अंत्यविधी करण्यात अडचण येत होती. मात्र येथील स्थानिकांचा नाईलाज होता त्यामुळे भर पावसातच आदिवासी ज्येष्ठ नागरिकांवर अंत्यविधी पार पाडावे लागले.मृत्यूचेनंतर देखील संबंधित दुर्दैवी आदिवासी नागरिकावर हि वेळ आली. घेरा सिंहगड ग्रामपंचायत मार्फत आतकरवाडी, सांबरेवाडी, थोपटेवाडी, भडाळेवाडी, दुर्गदरा व इतर ठिकाणी स्मशानभूमीसाठी राज्य सरकारमार्फत वन विभागाची जागा मिळावी म्हणून वेळोवेळी मागणी केली जात आहे मात्र वन विभागाच्या जाचक अटीमुळे हे जागा मागणीचे हे प्रस्ताव लालफितीतच अडकून पडले आहेत. माजी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी जागा मागणीचे आपले गार्हाणे पोहचवले आहे. घेरा सिंहगड मधील मधील नागरिकांची स्मशानभूमीसाठीची ही परवड आणखी किती दिवस चालणार असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाने ऐतिहासिक किल्ले सिंहगडाचे ऐतिहासिक महत्त्व विचारात घेऊन घेरा सिंहगड मधील सर्वच गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. “घेरा सिंहगड मधील रहिवाशांची परवड थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वनविभागाशी चर्चा करून घेरा सिंहगड मधील सर्व गावांत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. येथील चारही महसुली गावांसाठी गावठाण जाहीर करण्याचे प्रस्ताव मागीस आठ वर्षापासून जिल्हा प्रशासनाकडे धूळखात पडून आहेत.’ – दत्ता जोरकर (माजी सदस्य पंचायत समिती हवेली) ‘घेरा सिंहगड ग्रामपंचायत वारंवार स्मशानभूमीसाठी जागेची मागणी करत आहे. येथील आतकरवाडी, सांबरेवाडी, थोपटेवाडी,दुर्गदरा,भडाळेवाडी व इतर गावात वर्षांतुन पाच-सात वेळा अशीच दुर्देवी परिस्थिती निर्माण होते.सरकारने तातडीने आमचे जागेची अडचण दुर करावी.” – कु.मोनिका पढेर (सरपंच, घेरा सिंहगड)