Pune News : पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. मावळ तालुक्यातील शिरोटा डॅममध्ये फिरण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत मुळशी तालुक्यातील मुळा नदीपात्रात एका तरुणाचा जीव गेला. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pune News) शिरोटा डॅममध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरोटा डॅम येथे सहा विद्यार्थी पर्यटनासाठी आले होते. यावेळी डॅममधील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन विद्यार्थी पाण्यात बुडाले. मृत विद्यार्थ्यांमध्ये आर्य सुशांत बंडावर ही विद्यार्थिनी गोंदिया येथील असून करण ज्ञानदेव ठोंबरे हा विद्यार्थी सातारा जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Pune News) घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस येण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी दोघांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जीव वाचवता आला नाही. या घटनेमुळे त्यांच्यासोबत आलेल्या मित्रांना मोठा धक्का बसला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Pune News) मुळा नदीत तरुणाचा बुडून मृत्यू दरम्यान, दुसरी घटना मुळा नदीत परिसरातील मुलखेड येथे घडली. पंकज भिमराव केदारी (वय ३६) हा तरुण मित्रांसोबत नदीकाठी पार्टी करण्यासाठी गेला होता. पंकज हा पाषाण येथे राहत होता. (Pune News) शनिवारी दुपारी नदीपात्रात उतरल्यावर अचानक तो पाण्यात बुडू लागला आणि काही वेळातच दिसेनासा झाला. घटनेची माहिती मिळताच पौड पोलिस आणि मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. मात्र रात्री अंधार झाल्याने शोधमोहीम थांबवावी लागली. (Pune News) रविवारी सकाळी पंकजचा मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाने मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Pune News)