पुणे – रस्त्यासाठी पिण्याचे पाणी; ठेकेदाराला 50 हजारांचा दंड

पुणे – सिमेंट रस्त्यासाठी महापालिकेच्या जलवाहिनीला अनधिकृत नळजोड घेऊन पाणी वापरणाऱ्या ठेकेदारास महापालिका प्रशासनाने 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या ठेकेदाराने चक्क जलवाहिनीलाच टॅब मारल्याचा प्रताप दैनिक “प्रभात’ने उघडकीस आणला होता. त्याची गंभीर दखल घेत महापालिकेच्या प्रकल्प व्यवस्थापन विभागाने हा दंड ठोठावला आहे.

मागील महिन्यात स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमसमोर सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यासाठी चक्क पालिकेच्या जलवाहिनीला “टॅब’ मारून पाणीचोरी करण्यात येत होती. धक्कादायक बाब म्हणजे, महापालिका आयुक्तांनी लेखी आदेश काढून “सिमेंट रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी वापरले जाणार नाही’ याची तपासणी तसेच खबरदारीचे काम पथ विभागाकडे सोपविले होते. असे असतानाही गणेश कला क्रीडा मंच प्रवेशद्वारापासून सारसबागेकडे जाणाऱ्या सुमारे 100 मीटर लांबीच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरणासाठी पिण्याचे पाणी टॅंकरद्वारे वापरण्यात येत असल्याचे समोर आले होते. मात्र, ही बाब बाहेर आल्याने आता ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी थेट जलवाहिनीलाच “टॅब’ मारला असून त्यातून पिण्याचे पाणी रस्त्यासाठी वापरण्यात येत होते. ही बाब “प्रभात’ने निदर्शनास आणताच दुसऱ्याच दिवशी हा “टॅब’ बंद करण्यात आला होता. तसेच प्रकल्प व्यस्थापन विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर रात्रीच्या वेळी सुमारे 3 तास हे पाणी वापरण्यात आल्याचे समोर आले होते. ही बाब गंभीर असल्याने पालिकेने या ठेकेदारास नियमभंग केला म्हणून तब्बल 50 हजार रुपयांचा दंड आकारला आहे.

दंडामुळे इतरांना बसणार जरब
महापालिकेने केलेल्या या धडक कारवाईमुळे अशा प्रकारे पिण्याचे पाणी सिमेंट रस्त्यांसाठी वापरणाऱ्या ठेकेदारांना जरब बसणार आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेत पथ विभाग आणि प्रकल्प नियोजन विभागाकडून शहरात सुरू असलेल्या सर्वच रस्त्यांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.