पुणे: पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघात चार जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे २ आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सर्वपक्षीय पॅनलचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. अत्यंत चुरशीने मतदान झाल्यामुळे समसमान जागांवर विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी पेनेलचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रामकृष्ण सातव ( वाघोली) हे सर्वाधिक ४०५ मते घेवून विजयी झाले आहेत. तर, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सुदर्शन चौधरी (सोरतापवाडी)२५६ मते घेवून विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील एका जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे नानासाहेब आबनावे (चंदन नगर खराडी) हे ३०७ मतांनी विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघात शेतकरी विकास आघाडीचे रवींद्र कंद (लोणीकंद) ३७५ मते घेवून विजयी झाले आहेत.