Pune : ससूनमधील डॉ. नितीन अभिवंत यांचे ट्रेकिंगदरम्यान निधन

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नितीन नागनाथ अभिवंत (वय.४२) यांचे हिमालयातील बुरान व्हॅली येथे ट्रेकिंगदरम्यान श्वासोच्छवासात अडथळा आल्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, आठ वर्षांचा लहान मुलगा असा परिवार आहे.
ते शनिवारी (दि. ७) मुंबई येथून महाविद्यालयीन मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांसह ससून रुग्णालयातील त्यांच्या सहकारी, कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील, मोहोळ तालुक्यातील देवडी गावचे असलेले डॉ. अभिवंत हे सोलापूर येथे पाच वर्षांच्या सेवेनंतर ससून रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागात २०१४ पासून कार्यरत होते. महाविद्यालयीन जीवनापासूनच गिर्यारोहणाची आवड असलेल्या अभिवंत यांनी वासोटा किल्ला, महाबळेश्वर येथील पर्वतरांगा आणि अन्य ठिकाणीही गिर्यारोहण केले होते.
शनिवारी मुंबई येथून त्यांनी महाविद्यालयीन मित्रांसह हिमालयाकडे प्रयाण केले होते. सोमवारी (दि. ९) सकाळी गिर्यारोहणास सुरुवात केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांना श्वासोच्छवासात अडथळा आल्याने धाप लागून घाम फुटला, सोबत असलेल्या दोन डॉक्टर मित्रांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना तत्काळ बेस कॅम्पवरील रुग्णालयात हलवले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.





