Pune : डॉ. जालिंदर सुपेकरांनी फेटाळले आक्षेप

पुणे : पुणे पोलिसांनी वैशाली हगवणे हिचे सासरे राजेंद्र हगवणे, पती शशांक हगवणे आणि नीलेश चव्हाण या तिघांचेही शस्त्र परवाने रद्द केले आहेत. तिच्या पती आणि सासऱ्याला ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर तो पुणे पोलिसांकडून देण्यात आला होता. त्या वेळी पुणे पोलीस आयुक्तालयात अपर पोलीस आयुक्तपदी डॉ. जालिंदर सुपेकर होते. त्यामुळे अंजली दमानियांसह अनेकांनी त्याचा संबंध सुपेकरांबरोबर जोडला आहे. मात्र, डॉ. सुपेकरांनी ही बाब धुडकावून लावली आहे.
डॉ. जालिंदर सुपेकर (विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह सेवा सुधार विभाग महाराष्ट्र) यांनी स्पष्ट केले आहे, की शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात. तत्पूर्वी सदर अर्जदाराच्या अर्जावर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल संबंधित पोलीस उपयुक्तांना देतात. त्यांनी पडताळणी केल्यावर सदरचा परवाना पोलीस आयुक्त यांच्याच अंतिम मान्यतेने दिला जातो. त्यानंतर त्याचे आदेश हे अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन काढत असतात. संबंधित शस्त्र परवाना देण्याच्या अंतिम निर्णय प्रक्रियेमध्ये माझा कुठलाही सहभाग नसतो. त्यामुळे सदरचा परवाना मीच दिला आहे, हे म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान डॉ. सुपेकर यांचे नाव शशांक हगवणेचे मामा म्हणून पुढे आल्याने अनेक पक्ष संघटना त्यांच्या विरोधात निवेदने देत आहेत. यासंदर्भातील एक क्लिपही मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यामध्ये डॉ. सुपेकर हे निवेदनात माझे नाव टाकू नका, असे म्हणत आहेत.
मी तुमचा फायदा करून देईल, असाही क्लिपमध्ये संवाद आहे. मात्र, डॉ. सुपेकर यांनी ही क्लिपही बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. आमची बदनामी करण्याच्या दृष्टीने हेतुपूर्वक ती प्रसारित केली जात आहे. त्यामुळे अशा छेडछाड केलेल्या ऑडिओ क्लिपद्वारे माझी बदनामी करणाऱ्या संबंधिताविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.




