Pune: डॉ. दाभोलकर प्रकरण : सीबीआयचा अंतिम युक्तिवाद पूर्ण

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात सीबीआयचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला. त्यामध्ये सीबीआयने बचाव पक्षाचे म्हणणे खोडून काढले.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. मात्र, बचाव पक्षाचे म्हणणे आहे की टेम्पो मधून पुलावर त्यांचा मृतदेह फेकण्यात आला असण्याची शक्यता आहे. त्यावर पुलाच्या पूर्व बाजूला खुनाची घटना घडली आणि टेम्पो हा पश्चिम बाजूने गेला. त्यावेळी मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. म्हणजे जर पश्चिम बाजूने ट्रकमधून मृतदेह नेला असता तर त्या बाजूला रक्त दिसले असते.परंतु, तसा कोणताही पुरावा नाही. असा सीबीआयच्या वकिलांनी युक्तिवाद करीत बचाव पक्षाचे सर्व मुद्दे शनिवारी खोडून काढले.
दाभोलकर यांच्या खून खटल्याची सुनावणी न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये सीबीआयतर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांचा सुरु असलेला अंतिम युक्तिवाद शनिवारी(दि.१७) पूर्ण झाला. त्यांनी डॉ. दाभोलकरांची हत्या, त्यांच्याविषयी आरोपींमध्ये असलेली शत्रुत्वाची भावना, गुन्ह्याचा हेतू, ओळख परेड, अतिरिक्त न्यायालयीन कबुलीजबाब, शवविच्छेदनाच्या नोंदी, फिर्याद, आरोपींवर शस्त्रास्त्र आणि यूएपीए कायद्यान्वये कारवाई.
तसेच आरोपींचे मानसिकतेचे विश्लेषण, गुन्ह्याच्या घटनेची पुनर्रचना, रक्षाबंधनाच्या दिवशी अंदुरे आणि कळसकर आमच्यासमवेत असल्याचा बहिणींनी केलेला दावा अशा मुद्द्यांवर सीबीआय वकिलांनी अंतिम युक्तिवाद करीत बचाव पक्षांचे मुद्दे खोडून काढले. दरम्यान, दि. २२ फेब्रुवारी रोजी दाभोलकर कुटुंबियांचे म्हणणे लिखित स्वरूपात त्यांचे वकील अभय नेवगी न्यायालयात सादर करतील.
सोमनाथ धायडे याने गजानन मंदिरासमोर गारखेडा येथे एका समितीची बैठक झाली असल्याची साक्ष न्यायालयात दिली होती. बचाव पक्षाने कडा येथे बैठक झाल्यासंदर्भातली कागदपत्रे जलसंपदा खात्याकडून माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविली. आमचं म्हणणं हे होतं की गारखेडा आणि कडा एकच आहे हे दाखविणारा कोणताही पुरावा नाही. धायडे हा औरंगाबादचाच साक्षीदार होता पण त्याची उलटतपासणी घेण्यात आली नाही.
ज्याने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत कागदपत्रे दिली तो पुरावा रेकॉर्ड केलेला नाही. तसेच दाभोलकर यांच्या मृतदेहावर एक लांबलचक केस होता. मात्र सर्व साक्षीदारांनी आम्हाला याबद्दल काही माहिती नाही असे सांगितले. डॉ. तावरे यांनी उलटतातपासणी दरम्यान तो केस नव्हता तर काळा धागा होता असे ठामपणे सांगितले असल्याचेही सूर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितले.





