Pune: पंजाबमधील देश भगत विद्यापीठातर्फे डॉ. दीपक टिळक यांना सन्माननीय डी.लिट.

पुणे : पंजाब येथील देश भगत विद्यापीठातर्फे 11 व्या दीक्षान्त समारंभात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांना सन्माननीय डी.लिट. पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे. दि. 14 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या श्रीगोविंद सिंहजी सभागृहात पदवीप्रदान सोहळा होणार आहे.
देश भगत विद्यापीठाचे कुलपती डॉ. जोरा सिंह यांच्या हस्ते डॉ. दीपक टिळक यांना डी.लिट. पदवी दिली जाईल. महिलाशक्तीच्या विकासासाठी अखंड कार्यरत असलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.
देश भगत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अभिजित जोशी यांनी डी.लिट. पदवीची घोषणा केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने शताब्दीची गौरवशाली वाटचाल पूर्ण केली असून, नामांकित संस्था म्हणून शैक्षणिक कार्यात विद्यापीठ देशभरात पुढे आहे. डॉ. दीपक टिळक यांनी अनेक वर्षे टिमविचे कुलगुरुपद समर्थपणे सांभाळले. त्यांच्या कुलगुरुपदाच्या कारकिर्दीत विद्यापीठाने प्रगतीची नवी शिखरे सर केली. आता कुलपती म्हणून ते कार्यभार सांभाळत आहेत.
अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्ष म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. लोकमान्य टिळकांचे पणतू असलेले डॉ. टिळक ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक आहेत. टिळक स्मारक ट्रस्टसह अनेक संस्थांच्या प्रगतीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ज्युदोला संपूर्ण भारतात प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात स्पर्धा आयोजित करण्याबरोबरच इच्छुकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले.
लोकमान्य टिळकांच्या अखंड प्रेरणादायी चरित्रासह लोकमान्यांचे विचारधन आणि विविध क्षेत्रांतील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. टिळक सतत कार्यशील असतात. त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल अनेक संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
जपान सरकारच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून जपान व भारतीय संस्कृतीत सेतू निर्माण करण्याच्या कार्याबद्दल डॉ. टिळक यांना गौरविण्यात आले. सामाजिक सक्रियता आणि सांस्कृतिक कार्यासाठीच्या त्यांच्या बांधिलकीमुळे त्यांना विविध स्तरांतून आदर आणि प्रशंसा मिळाली.
डॉ. दीपक टिळक यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना देश भगत विद्यापीठातर्फे डी.लिट. पदवी जाहीर करण्यात आली असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले. देश भगत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अभिजित जोशी, प्र-कुलगुरू प्रा. ताजेंद्र सिंग, कुलसचिव कर्नल प्रदीप कुमार, डॉ. संदीप सिंह, डॉ. आर. एस. बेदी, प्रा. डॉ. ऋषी कौर बेदी, टी. एस. बेदी, हरविंदर सिंग दीक्षान्त सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.


