Pune : डॉ. बिपिन सुळेंना ‘सरदार पटेल युनिटी पुरस्कार’; व्यावसायिक शिक्षणातील योगदानाची दखल

पुणे : विश्वकर्मा ग्रुप – इन्स्टिट्यूट्स अॅण्ड युनिव्हर्सिटी, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपिन सुळे यांना ‘सरदार पटेल युनिटी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रातील त्यांचे भरीव योगदान, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या कार्याची दखल म्हणून त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आला.
हा पुरस्कार गोवा येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि खासदार तसेच ज्येष्ठ अभिनेत्री खासदार हेमा मालिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. बिपिन सुळे यांनी विश्वकर्मा ग्रुपच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके नावीन्यपूर्ण आणि गुणवत्ताधिष्ठित उपक्रम राबवले आहेत. तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, डिजिटायझेशन अशा अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देणे नव्हे तर त्यांना ‘फ्युचर रेडी’ बनवण्यावर त्यांनी भर दिला आहे.
शिक्षण संस्थांचे फक्त प्रशासकीय व्यवस्थापन न करता त्या संस्थांमधील शैक्षणिक मूल्यवृद्धी, संशोधन आणि औद्योगिक संलग्नता वाढवण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे केले आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या करिअरच्या वाटा घडवण्यात आणि त्यांना उद्योगजगतात पायावर उभं करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
‘सरदार पटेल युनिटी पुरस्कार’ हा राष्ट्रीय स्तरावरील एक सन्मान असून सामाजिक एकात्मता, शिक्षणातील गुणवत्ता आणि नेतृत्वगुण यांचे प्रतीक मानला जातो. डॉ. सुळे यांचा हा सन्मान शिक्षण क्षेत्रातील अनेक नवोदित नेत्यांना प्रेरणा देणारा ठरणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

