Pune : धमकी आली तरी काळजी करू नका

पुणे : तुर्कस्थानच्या मालावर ज्यांनी बहिष्कार टाकला आहे. त्या फळांच्या व्यापाऱ्यांची अभिनंदन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांनी जर स्वतःहून राष्ट्र प्रथम ही भावना नजरेसमोर ठेवून काही कृती केली असेल तर मी त्यांचे स्वागत करतो. पहलगामवरील हल्ला फक्त भारतावरच नाही तर तो मानवतेवर झालेला मोठा हल्ला होता. मानवतेच्या हल्लेखोरांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास प्राप्त आहेत. तसेच, त्यांना धमकी आली असेल तर त्यांनी काळजी करण्याची गरज नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यशदा येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राष्ट्र प्रथम ही आपल्या सर्वांची भूमिका असली पाहिजे. पहलगाममध्ये आपल्या लोकांना अतिशय क्रूर पद्धतीने मारले गेले, अशी क्रूरता करणारा देश आणि त्याला साथ देणाऱ्या देशांनाही धडा शिकविण्याची गरज आहे. पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उध्वस्त करणारा आपला देश आहे. आता, तर न्यूयॉर्क टाइम्सने सॅटेलाइट इमेजसह पाकिस्तानचे सत्य बाहेर काढले आहे. ते भारताला नखही लावू शकले नाहीत. पण, आम्ही पाकिस्तानला कसे उध्वस्त केले, हे जगासमोर आले आहे.
पुण्यातील फळाच्या व्यापाऱ्यांनी तुर्कस्थानवरील सफरचंद खरेदीवर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापाऱ्यांचे मी कौतुक करतो. त्यांना धमकी आल्याचेही समजले परंतु, आमच्या कुठल्याही व्यापाऱ्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. याची मी खात्री देतो.
– एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
पडळकर यांना सांगितले…
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकमधील मिरवणुकीत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकविण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यावर विचारले असता ते म्हणाले की, आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी याबाबत बोलणे झाले असून त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी, असे सांगितले आहे. या प्रकारावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. लॉरेन्स बिश्नोई सारख्या गुंडाचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही. ज्यांनी फलक झळकवले त्यांच्यावर कारवाई होईल.





