Pune : एजंटच्या भूलथापांना बळी पडू नका

पुणे : आरटीईअंतर्गत प्रवेशामध्ये अनेक पालक एजंटच्या भूलथापांना बळी पडतात. विशेषत: मुळशी तालुक्यात असे अनेक प्रकार घडत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. प्रवेशासाठी खोटी माहिती दिल्याचे आढळत्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शाळेत प्रवेशास पाल्य पात्र ठरण्यासाठी पालकांकडून खोटी माहिती देण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शाळेच्या जवळचा निकषामध्ये बसण्यासाठी चुकीचे भाडेकरार दिले जातात. त्याचबरोबर उत्पन्नाच्या अटीमध्ये बसण्यासाठी चुकीचा उत्पन्नाचा दाखला कागदपत्रांसह दिला जातो. यासाठी काही एजंटच तयार झाले आहेत.
अशाप्रकारे चुकीच्या गोष्टी करून खरे गरजू विद्यार्थी आरटीईअंतर्गत प्रवेश मिळण्यापासून वंचित राहतात. गतवर्षी अशाप्रकारे चुकीची माहिती देऊन प्रवेश घेतलेल्या २० विद्यार्थ्यांचे प्रवेश शिक्षण विभागाकडून रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकट्या मुळशी तालुक्यातील १८ जणांचा, तर बारामती तालुक्यातील दोघांचा समावेश होता, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले, की आरटीई प्रवेश प्रक्रिया ही पूर्णतः पारदर्शक आणि ऑनलाइन असल्याने पालकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये.
तसेच चुकीचे भाडेकरार करून देणे, चुकीचा उत्पन्न दाखला, चुकीचे कागदपत्रे देणे अशा प्रकारे शासनाची फसवणूक केली, तर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे पालकांनी आपली फसवणूक होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी. तालुका स्तरावर पालकांसाठी मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात येणार आहेत.





