Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टला अडीच एकर जमीन दान

पुणे : देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे…
या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विं. दा. करंदीकरांनी लिहिलेल्या कवितेच्या ओळींची अनुभूती खऱ्या अर्थाने घडून आली. ज्ञानेश रवींद्र भाटवडेकर आणि त्यांच्या आई मीरा यांनी मावळ तालुक्यातील कार्ला येथील त्यांच्या मालकीची सुमारे अडीच एकर जमीन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला देणगीदाखल दिली आहे. ज्ञानेश हे ठाणे येथील व्यावसायिक असून, त्यांनी त्यांची बहीण प्रज्ञा हिच्या स्मरणार्थ हे सत्कार्य केले आहे.
ज्ञानेश यांची बहीण तिच्या लहानपणीच निवर्तली. त्यांच्या वडीलांच्या इच्छेनुसार त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांचे वडील आता हयात नाहीत, परंतु त्यांच्या इच्छेनुसार ज्ञानेश यांच्या आई मीरा, पत्नी डॉ. प्रिया आणि मुलगा अनिश यांनी या जमिनीचे हस्तांतरण श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आणि कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्याकडे केले. यावेळी दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, समीर लांबट, प्रशांत गोलाइत आदी उपस्थित होते.
ही अडीच एकर जमीन कार्ला येथे हायवेच्या अगदी लगत काहीच अंतरावर आहे. या जमीनीवर ट्रस्टने सर्वसामान्यांना उपयोगी पडेल असा सामाजिक किंवा शैक्षणिक उपक्रम उभा करावा, अशी इच्छा भाटवडेकर कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. ही जमीन एखाद्या संस्थेला सामाजिक उपक्रमासाठी द्यावी या हेतूने त्यांनी अनेक संस्था धुंडाळल्या, त्यांचे कार्यही पाहिले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून केल्या जाणाऱ्या समाजकार्याची माहिती त्यांनी घेतली. त्यांचे कार्य कुटुंबातील सर्वांना भावले आणि त्यांनी ही जमीन सामाजिक कामाच्या उपयोगासाठीच ट्रस्टकडे सुपूर्त करण्याचा निर्णय घेतल्याचे कुटुंबियांतर्फे सांगण्यात आले.
ज्ञानेश यांनी ही इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही ती जमीन पाहण्यासाठी कार्ला येथे गेलो. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. देणगीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून ही जमीन भाटवडेकर कुटुंबियांनी ट्रस्टकडे सुपूर्त केली आहे. आजच्या घडीला या अडीच एकर जमिनीचे सरकारी बाजारमूल्य सुमारे साडेचार कोटी रुपये आहे. त्यांच्या इच्छेनुसार या जमिनीवर शैक्षणिक किंवा वैद्यकीय असे सामाजिक उपक्रमच उभारले जातील.
– महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट





