पुणे- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळे उघडकीस येण्याचे सत्र सुरुच आहे. परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना निलंबितही करण्यात आले आहे. आता या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यास अधिकाऱ्यांकडून स्पष्ट नकार देण्यात येऊ लागला आहे.
टीईटी’ परीक्षेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांची अटक केली आहे. त्यांना पोलिस कोठडीही देण्यात आलेली आहे. त्यामुळे परिषदेच्या आयुक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे द्यायला असा प्रश्न उपस्थित झाला होता. परीक्षा परिषदेत हारुन आत्तार, शैलजा दराडे हे दोन उपायुक्त आहेत.
यापैकी कोणाला तरी आयुक्त पदाची सूत्रे देण्याचे सोयीचे ठरेल असा विचारही करण्यात आला. त्यानुसार आत्तार यांच्याकडेच सूत्रे देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, आत्तार यांनी हा अतिरिक्त कार्यभार स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. हा कार्यभार कोणत्यातरी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. आत्तार यांच्याकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातील सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार पूर्वीच सोपविण्यात आलेला आहे. त्यामुळे तीन पदांची सूत्रे सांभाळणे आत्तार यांना डोकेदुखी व अडचणीचे ठरणार आहे. इतर ही कोणी अधिकारी कार्यभार स्वीकारण्यास तयार होत नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.