पुणे -महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागातील अकृषक वर्गवारीतील वीज ग्राहकांची थकबाकी 1950 कोटी रुपयांवर पोहचली आहे. यात 16 लाख घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे व इतर ग्राहकांचा समावेश आहे. या थकबाकीत सर्वांत मोठा आकडा हा सार्वजनिक पथदिवे योजनेचा असून 21,604 योजनांचे तब्बल 1,188 कोटी रुपये थकले आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या 10747 ग्राहकांकडे 420 कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकूण 13 लाख 62 हजार 329 घरगुती ग्राहकांकडे 170 कोटी रुपयांची थकबाकी असून एक लाख 40 हजार 688 वाणिज्यिक ग्राहकांकडे 54 कोटी रुपयांची व 39 हजार 310 औद्योगिक ग्राहकांकडे 82 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला रोजच वीज विकत घ्यावी लागते. यासाठी वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना रोजच पैसे द्यावे लागते. थकबाकीमुळे महावितरणला महागड्या व्याजाने कर्ज काढून वीज निर्मिती कंपन्यांना घेतलेल्या विजेचे पैसे अदा करावे लागत आहे. याचा विजेच्या दरावर परिणाम होऊन विजेचे दर वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन नाळे यांनी केले आहे. ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी थकबाकी वसूल होणे आवश्यक असून, थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे. या ग्राहकांनी तातडीने थकबाकी भरावी. – अंकुश नाळे, प्रादेशिक संचालक, महावितरण