अजित पवार भेटल्यास अभिनंदन करण्याचे सूतोवाच बारामती – बारामती विधानसभा मतदारसंघातून पराजित झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी बारामती मतदारसंघातील काही गावात जाऊन मतदारांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे भेटल्यास त्यांचे अभिनंदन करणार असल्याचे वक्तव्य युगेंद्र पवार यांनी यावेळी केले. तालुक्यातील काटेवाडी, ढेकळवाडी, सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी, मेखळी, घाडगेवाडी, नीरा वागज, खांडज, शिवली, सांगवी, कांबळेश्वर या गावात जाऊन युगेंद्र पवार यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. आभारही मानले. संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघकडे लागून राहिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडणुकीचे रिंगणात उभे होते. प्रथमच पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असल्याने कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले होते. अजित पवार हे आठव्यांदा निवडणुकीला सामोरे गेले होते. युगेंद्र पवार यांची पहिली वेळ होती. विकासाच्या मुद्द्यांवर बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी अजित पवार यांना पसंती देत १ लाख ८९९ इतक्या मताधिक्याने विजयी केले. युगेंद्र पवार यांना ८० हजारांहून अधिक मते मिळाली. मतदारांचे आभार मानण्यासाठी युगेंद्र पवार यांनी तालुक्यात आभार दौऱ्याचे आयोजन केले आहे. त्यांनी तालुक्यातील काही गावातील मतदारांचे आभार मानले. मतपडताळणीकडे लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयावर संशय व्यक्त करीत युगेंद्र पवार यांनी देखील मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे. अजित पवार यांच्या मताधिक्यविषयी ते साशंक आहेत. त्यामुळे मत पडताळणीत काय होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.