पुणे जिल्हा : तुकोबारायांच्या पालखी स्वागतासाठी यवतकर सज्ज

दौंड तालुक्यात यवत, वरवंड दोन दिवस मुक्काम
मनोज खंडाळे
यवत – लोणीकाळभोर येथील मुक्काम आवरून पुढे दौंड तालुक्यात यवतच्या दिशेने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामासाठी यवत येथे येत आहे. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी संपूर्ण यवत नगरी व दौंड तालुक्यातील संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे. पालखी सोहळ्यात असणार्या लाखो वारकर्यांना सोयीसुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत, पोलीस, महावितरण, आरोग्य प्रशासन, महसूल प्रशासन, पंचायत समिती प्रशासनाने तयारी केली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवार (दि. 3) रोजी यवत मुक्कामी तर गुरूवारी (दि. 4) वरवंड येथे येत आहे. वारीतील वारकर्यांना कसलीही कमतरता भासू नये यासाठी ग्रामपंचायतीने जय्यत तयारी केली असल्याची माहिती सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव व ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे, पोलीस प्रशासन, महसूल विभाग यांनी दिली.
यावर्षी एकूण 1200 स्वच्छतागृहे विविध ठिकाणी बसविली जाणार आहेत. काळभैरवनाथ मंदिरालगत मोबाईल चार्जिंगची सुविधा दिली गेली आहे. यामध्ये एकाच वेळी 300 हून अधिक मोबाइल चार्जिंग करता येतील त्याचबरोबर पालखीतळ परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. एकंदरीत प्रशासनाने युद्धपातळीवर काम करत वारकर्यांच्या स्वागतासाठी तयार झाले आहे. श्री काळभैरवनाथ मंदिराशेजारी एकावेळेस 1000 वारकर्यांच्या तर जिल्हा परिषद शाळेजवळ वारकर्यांना आंघोळीसाठी विशेष व्यवस्था ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली असून एकावेळेस 500 वारकर्यांच्या आंघोळीची व्यवस्था करण्यात आली आहे.
वारकर्यांच्या मुक्कामासाठी जिल्हा परिषद शाळा क्र. 1 आणि क्र. 2, विद्या विकास मंदिर, चार मंगल कार्यालये, यवत स्टेशन जिल्हा परिषद शाळा, इंदिरानगर जिल्हा परिषद शाळा येथे व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी टँकर भरण्याची व्यवस्था शाम पवार, सोना कुदळे व रमेश बनसोडे यांच्या तीन विहिरीवर करण्यात आली आहे. पालखी मार्ग आणि परिसरातील सर्व विहिरीमध्ये टीसीएल टाकून शुद्धीकरण करण्यात येत आहे. जागोजागी सहा ठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा उशीरा यवत येथे मुक्कामी येत असल्यामुळे पुणे-सोलापूर महामार्ग सेवा रस्ता, पालखी मार्ग व ग्रामपंचायत परिसरात विद्युतीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच समीर दोरगे यांनी दिली.
ग्रामीण रुग्णालयात वारकर्यांसाठी स्वतंत्र विभाग
प्रथमच ग्रामीण रुग्णालयात पालखी मुक्कामाच्या वेळी विशेष आरोग्य सुविधा दिली जाणार आहे. वारकर्यांसाठी स्वतंत्र कक्ष तयार केला गेला असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक किशोर पत्की व डॉ. बाळासाहेब कदम यांनी दिली. वेगवेगळ्या आजारांवर अपघाती व इमर्जन्सी आरोग्य सुविधा दिली जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टर यांचे पथक व कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. कोणी गंभीर आजारी पडल्यास अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आला असून पाच बेडचा आय. सी. यू. विभाग निर्माण करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण व यवत पोलिसांचा चोख बंदोबस्त
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या बंदोबस्त साठी यवत पोलीस ठाणे आणि पुणे ग्रामीण पोलीस प्रशासन सज्ज झाले असून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 2 सहाय्यक पोलीस अधीक्षक, 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 69 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 600हुन अधिक अमलदार, 100 महिलांसह 600होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या, 2 दंगल नियंत्रक पथके वरवंड येथील ए. सी. दिवेकर महाविद्यालयाचे एनसीसीचे 100 विद्यार्थी, 100 विशेष पोलीस अधिकारी असा सुमारे 1500 ते 2000 हून अधिक पोलीस आणि त्यांना सहकार्य करणार्या स्वयंसेवक संस्थेची पथके असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.





