Pune district : सणसवाडी व करंदीत कामगारांचा पगारासाठी ठिय्या

शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरूर) येथील इनफिल्युम इंडिया प्रा. लिमिटेड कंपनी प्रशासनाने कामगरांना चार महिन्यांपासून पगार न दिल्याने संतप्त कामगारांनी कंपनीच्या गेटवर ठिय्या मांडला. अखेर कंपनी प्रशासन व पोलिसांच्या मध्यस्तीनंतर कामगारांनी पुन्हा काम सुरु केले आहे.
सणसवाडी येथे इनफिल्युम इंडिया प्रा. लिमिटेड कंपनी असून या कंपनीचे करंदीमध्ये गोडावून आहे. कंपनीमध्ये अडीचशेहून अधिक कामगार असून त्यामध्ये अनेक महिला देखील आहेत; मात्र गेली चार महिन्यांपासून कंपनीने कामगारांचे पगार थकवले असल्याने कामगार व कामगारांचे कुटुंब आर्थिक अडचणीत आलेले असल्याने कामगारांनी आज सकाळच्या सुमारास सणसवाडी येथे कंपनी गेट तर करंदी येथे गोडावून गेटवर ठिय्या मांडला. तर काही कामगारांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
यावेळी पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलीस हवालदार संदीप कारंडे यांनी कंपनी प्रशासनाशी चर्चा केली. कंपनी एचआर सागर काळे यांनी पुढील आठवड्यात पगार करण्याची ग्वाही दिली असल्याने कामगारांनी ठिय्या मागे घेतला; मात्र आमचे पगार अनेक दिवसांपासून रखडल्याने आम्ही अडचणीत आलेलो असल्याने काम न करण्यावर आम्ही ठाम असल्याचे काही कामगारांनी सांगितले.
आम्ही कंपनी प्रशासनाशी चर्चा केली असता त्यांनी बारा तारखेला पगार देण्याचे जाहीर केले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख यांनी सांगितले.
आमची कंपनीच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असून बारा तारखे पर्यंत कामगारांना पगार देण्याचे नियोजन सुरू आहे.
-सागर काळे, एच आर व्यवस्थापक





