१० कोटींच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन माळेगाव – माळेगाव परिसरातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जाणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन शनिवार (दि.१२) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, माळेगाव नगरपंचायतसाठी भरीव निधी देऊन चेहरामोहरा बदलून टाकणार आहे. खेळाडूंनी सराव करून क्रीडा स्पर्धेत तसेच स्पर्धा परीक्षेतील पोलीस दलात भरतीसाठी मेहनत घ्यावी, विद्यार्थ्यांना कोणतीही कसर कमी पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी माळेगाव तालुका क्रीडा संकुल ११ एकरांमध्ये साकारलेले आहे. बहुउद्देशीय हॉलमध्ये इनडोअर खेळाच्या सर्व क्रीडा बाबी यामध्ये तायक्वांदो, जुडो, कुस्ती, कबड्डी, कराटे, बॅडमिंटन यासारख्या स्पर्धा हॉलमध्ये होतील. हॉलच्या बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जेची दहा मीटर २५ मीटर व ५० मीटर शूटिंग रेंज तसेच अद्ययावत व्यायामशाळा आदी कामे होणार आहेत. शासनाकडून या सर्व कामाकरिता दहा कोटी रुपये मंजूर होणार आहेत. यावेळी कामकाजाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाशी निगडित तांत्रिक बाबी जाणून घेतल्या, त्यानुसार काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी क्रिकेट प्रॅक्टिस नेटचे देखील उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता भारतकुमार बाविस्कर, मुख्याधिकारी बालाजी लोंढे, जिल्हा बँक अध्यक्ष प्रा. दिंगबर दुर्गाडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, माजी सरपंच दीपक तावरे, जयदीप तावरे, कारखान्याचे संचालक शिवराज राजे जाधवराव, ॲड. राहुल तावरे, प्रा. लक्ष्मण भोसले, राहुल खाटमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून तालुका क्रीडा संकुलासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला असून ग्रामीण भागातील खेळाडूंना यामुळे मोठ्या सुविधा उपलब्ध होणार आहे. आम्ही अजित पवार यांना माळेगावकरांसाठी स्विमिंग टॅंकची मागणी केली. त्यानंतर अजित पवार यांनी आम्हाला दिलेल्या सूचनेवरून आम्ही लवकरच स्विमिंग टॅंक साठीचा प्रस्ताव पुढे पाठवणार आहे. – दीपक तावरे, क्रिडा संकुल समिती सदस्य.