पुणे जिल्हा : शेवटच्या श्वासापर्यंत पाणी सुरक्षित ठेवणार

सहकारमंत्री वळसे पाटलांचे आश्वासन : मंचरमध्ये सांगता सभेला तुफान गर्दी
मंचर – आंबेगाव तालुक्यातील शेतीचे पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी माझा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत सुरक्षित राहणार हे पाणी कोणीही घेऊन जाणार नाही, पुढील पाच वर्षे मतदारसंघातील प्रलंबित राहिलेले पाणीप्रश्न सोडवण्यासाठी दिली जातील, अशी ग्वाही आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस) तथा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मंचर (ता. आंबेगाव) येथे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या विजय निर्धार मेळाव्याच्या सांगता सभेला मार्गदर्शन करताना वळसे पाटील बोलत होते. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, किरणताई वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, विष्णूकाका हिंगे पाटील, सुषमा शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील, अतुल ब्रह्मभट, जयसिंगराव एरंडे, डॉ. ताराचंद कराळे, संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले, शिवसेनेचे सचिन बांगर, प्रमोद थोरात पाटील, अजित चव्हाण, आरपीआयचे गणेश कसबे पाटील, रमेश येवले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी गावचे सरपंच आणि मोठ्या संख्येने मतदार सभेला उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, मला कोणती ईडीची, सीबीआयची किंवा कोणतीच नोटीस नाही. त्या भीतीने मी भाजप सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सहभागी झाल्याची विरोधी उमेदवार चर्चा करतात; परंतु मी आज मतदार बंधू-भगिनींच्या साक्षीने सांगतो की मला कोणतीही नोटीस आजवर आलेली नाही. जर कोणाला नोटीस मिळाली तर मी माझी उमेदवारी मागे घेईल, केवळ विकासाचे कोणतेही मुद्दे विरोधकांकडे नाही बदनामी आणि धांगडधिंगा करून विकास होत नाही, त्यामुळे बेताल वक्तव्य करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात; परंतु येथील जनतेला माहिती आहे की कोण खरं आणि कोण खोटं, समोरील उमेदवार प्रचारांमध्ये यांची नार्कोटेस्ट करा .अशी जाहीर मागणी करत आहे तर माझेही म्हणणं आहे की माझी नार्को टेस्ट करा माझ्यातून विकासच बाहेर येईल .परंतु तुमचे नार्को टेस्ट केली तर तुम्हाला बाहेर फिरणं मुश्किल होईल. अशी टीका करत उमेदवार वळसे पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
पूर्वा वळसे म्हणाल्या की, पाण्यामुळेच आंबेगावची समृद्धी टिकून आहे आणि चुकीच्या पद्धतीने विचार करून जर आपण विकासाला साथ देण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने काम करणार्या व्यक्तीला साथ दिली तर तालुक्यासह आजूबाजूच्या शेतीचेही प्रचंड नुकसान होईल. यासाठी उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना मोठ्या बहुमताने विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले आभार निलेश थोरात यांनी मानले.
निवडून दिलेल्या खासदाराने केवळ मतदारांची दिशाभूल चालवली आहे. कोणतेही काम न करता थेट लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत भूलवलया करण्यासाठी ते येथे येतात. विरोधी उमेदवार केवळ चुकीच्या पद्धतीने राजकारण करून विकास साध्य करू शकत नाही. शरद पवार यांच्या सभेत लाव रे व्हिडिओ म्हणणा-यांनी रात्री घरी व्हिडिओ लावून पहावे. विरोधकांना आता पाडा, पाडा, पाडा अन् सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मतदारांनी साथ द्यावी आणि बोगद्याला साथ देणार्यांचे पितळ उघडे पाडावे .
– शिवजीराव आढळराव पाटील, अध्यक्ष, म्हाडा, पुणे
गर्दीमुळे व्यासपीठावर पोहोचण्यास लागला अर्धा तास
शरदचंद्र पवार यांची सभा चार दिवसापूर्वी मंचर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ झाली. त्याच ठिकाणी महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांची आजची सभा रेकॉर्ड ब्रेक झाली. सभेला महिला भगिनींसह मतदारांची प्रचंड गर्दी होती. सभास्थळी पोहोचण्यासाठी उमेदवार वळसे पाटील आणि म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनापायी चालताना 500 फूट अंतर कापण्यासाठी आणि पोलिसांना मतदारांच्या गर्दीमधून रस्ता करत व्यासपीठावर पोहोचण्यासाठी जवळपास अर्धा तास लागला.
रेकॉर्डब्रेक गर्दी
उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती .व्यासपीठ आणि आजूबाजूला सुमारे 25 हजारांपेक्षा जास्त मतदारांची गर्दी झाली होती. जागा पुरली नाही म्हणून अक्षरशः रस्त्यावर उभ्या केलेल्या स्क्रीनवर आठ ते दहा हजार मतदार उभे राहून ही सभा पाहत होते. सभेमधला जल्लोष आणि घोषणांच्या वातावरणामुळे आजची सभा आंबेगाव तालुक्याच्या इतिहासात उच्चांकी झाल्याची चर्चाही मतदार करत असल्याचे दिसून आले.
उमेदवार दिलीप वळसे पाटील भाषणाला उभे राहतात अजित पवार दिलीप वळसे पाटील, आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजयाच्या सततच्या घोषणांनी उमेदवार वळसे पाटील यांना भाषण सुरू करता येईना .अखेर शेवटी त्यांनी हात जोडून सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करून भाषण सुरू केले .त्यावेळी अधून मधून जय जय कराच्या घोषणा होत होत्या. त्यावेळी वळसे पाटील यांनी पुन्हा मतदारांना शांत राहण्याचे आवाहन करून आपले भाषण सुरू केले.





