पुणे जिल्हा : ‘इथेनॉल’बाबत केंद्रीय मंत्री अमित शहांबरोबर चर्चा करणार

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आश्वासन
मंचर – इथेनॉल बनवण्याच्या संदर्भात काही मर्यादा घालणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र, त्या संदर्भात सुधारणा करून निर्णय मागे घेतला असला तरी या निर्णयात अनेक त्रुटी असून याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी सोमवारी (दि. १८) नवी दिल्ली येथे चर्चा करणार असल्याची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली .
मंचर (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (दि. १६) प्रसार माध्यमाशी बोलताना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, देशातील सहकारी साखर कारखान्यांचे साखर उत्पादन कमी झाल्याने साखर उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कारखान्यांना इथेनॉल बनवता येणार नाही, असा निर्णय केंद्र शासनाने घेतला होता.
मात्र, याला साखर कारखानदारांकडून विरोध झाल्याने निर्णय मागे घेत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. मात्र, निर्णय मागे घेतला असला तरी त्यामध्ये अनेक त्रुटी असून त्यात सुधारणा करण्याची गरज असून याबाबत सोमवारी (दि. १८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
अजित पवार व आम्ही प्रमुख नेते दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील कांदा व इतर प्रश्न बाबतही चर्चा करणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.





