Pune District : झिगझॅक डोंगरावर भडकला वणवा

नारायणगाव : वारुळवाडी (ता. जुन्नर) महाळुंगे रस्त्यावरील वनविभागाच्या हद्दीतील झिगझॅक ठिकाणच्या डोंगराला बुधवारी (दि. 7) रात्री 10.30 च्या सुमारास आग लावण्याचा प्रकार घडला. तब्बल दोन तासानंतर डोंगराला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
आगीची माहिती मिळताच जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जुन्नर वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले, खंडू भुजबळ, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, रेस्क्यू टीम सदस्य आदित्य डेरे, सुशील बॉबी ढवळे, ऋत्विक डेरे, शंतनु डेरे, आपदा मित्र मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आण्यात सुरुवात करुन डोंगराला लागलेली आग आटोक्यात आणली.
पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट असल्यामुळे वार्याचे प्रमाण जास्त असल्याने आग आटोक्यात आणताना मोठी कसरत करावी लागली. तब्बल तीन एकर क्षेत्राला आग लागलेली होती. डोंगराच्या खालच्या बाजूला व्यापारी महासंघ नारायणगाव, वारूळवाडी यांनी 100 झाडांची वृक्ष लागवड केलेली होती.
डोंगराला लागलेली आग वेळीच आटोक्यात आणली नसती तर वृक्ष लागवड केलेल्या झाडांचे नुकसान झाले असते.घटनास्थळी युवकांची मदत मिळाल्याने वनविभागाचे, निसर्गाचे व डोंगरावरील सरपटणारे प्राणी, किडे, मुंग्यांचे प्राण वाचलेले आहे.
वारुळवाडी (ता. जुन्नर) : महाळुंगे रस्त्यावरील वनविभागाच्या हद्दीतील डोंगराला लागली आग.





