पुणे जिल्हा : रस्ता सुस्थितीत नसल्याने टोल का द्यावा

– ग्राहक पंचायतीचे नितीन मिंडे यांचा प्रतिप्रश्न.
मंचर – पुणे-नाशिक महामार्गावरील कळंब (ता.आंबेगाव) परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्ता सुस्थितीत नसल्याने आणि अपघाताला निमंत्रण देणारा असल्याने वाहन चालकांनी टोल का द्यावा, असा प्रतिप्रश्न ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा माजी सहसचिव नितीन मिंडे यांनी उपस्थित केला आहे.
पुणे-नाशिक हम रस्ता कळंब परिसरातून गेला आहे. परंतु गेल्या काही दिवसात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता खराब असूनही प्रवाशांना पिंपळवंडी-आळेफाटा नजीक असणाऱ्या टोलनाक्यावर टोल द्यावा लागतो. हा प्रकार बरोबर नाही. रस्ता सुस्थितीत नसताना आणि अपघाताला निमंत्रण देणारा असताना टोल का द्यावा, असा प्रश्न नितीन मिंडे आणि प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
विशेषत: कळंब ते नारायणगाव या दरम्यान मोठ्या प्रमाणात हम रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यांमध्ये जाऊन दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अनेकांना दीर्घ आजारांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत पुणे-नाशिक हमरस्त्याचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी रस्ता खड्डे मुक्त करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात,अशी मागणी मिंडे यांनी केली आहे.
महामार्ग अधिकाऱ्यांनी रस्त्यांची तपासणी करावी
वारजे पुणे येथील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथे पुणे-नाशिक हम रस्त्याचे कार्यालय आहे. परंतु या कार्यालयाचे अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर फिरत नाही. त्यामुळे त्यांना रस्त्याची काय अवस्था झाली हे लक्षात येत नाही. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याची अवस्था पाहण्यासाठी दौरा करावा, अशी मागणी ही ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी मिंडे यांनी केली आहे.





