पुणे जिल्हा : खेड बाजार समितीच्या सभापतिपदी कोणाची वर्णी?

अद्याप तारीख जाहीर नसली तरी गुप्त हालचालींना वेग
रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी निवडायची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान झाले होते, त्याच दिवशी रात्री मतमोजणी झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्री भीमाशंकर सहकारी शेतकरी पॅनलने 18 पैकी 10 जागा जिंकत बाजी मारली होती तर सर्व पक्षीय श्री भीमाशंकर सहकार शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले होते. अडते व्यापारी मतदार गट तटस्थ होता, त्यामुळे ते दोघे सत्तेकडे जाणार की सर्व पक्षीय आघाडीला मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्व पक्षीय पॅनलमध्ये 6 संचालक निवडून आले आहेत. तालुक्यातील सर्व पक्षीय नेते विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस व आमदार दिलीप मोहिते पाटील असा गेली अनेक वर्षाचा राजकीय विरोध आहे. आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात सर्व पक्षीय नेते अनेकदा एकवटले असल्याचे गेल्या अनेक वर्षांपासून चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकारणाची चर्चा होत असते.
पुन्हा पाकीट संस्कृती?
जिल्हात सांविधिक मोठी उलाढाल असलेली खेड कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. त्यावर नेतृत्व करणाऱ्यासाठी अनेकांची इच्छा असते त्यामुळे या बाजार समितीवर संचालक होण्यासाठी उमेदवारांनी पाकीट संस्कृती वापरली. मतदार
विकत घेत बाजी मारली त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. हीच पाकीट संस्कृती सभापती पदासाठीच्या निवडणुकीत चालणार तर नाही ना याची दबक्या आवाजात तालुकाभर चर्चा आहे. सभापती पदासाठीच्या गुप्त हालचालींना वेग आला आहे.
स्वत: आमदार की कार्यकर्ता?
बाजार समितीच्या सभापतिपदाच्या मैदानात निवडून आलेले मातब्बर संचालक आहेत. त्यामुळे सभापतिपदासाठी कदाचित चुरस होण्याची शक्यता आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील गटाचे वर्चस्व असल्याने त्यांच्या गटाचाच संचालक सभापतिपदी विराजमान होणार हे सत्य आहे. त्यामुळे आमदार दिलीप मोहिते हे स्वतः संचालक असल्याने ते सभापती होणार की दुसऱ्या संचालकाल संधी देणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्याला नेहमीच अनेक संधी देतात; मात्र बाजार समितीच्या निवडणुकीत इतर पक्षातील संचालक त्यांच्या पॅनलमध्ये आल्याने त्यांना संधी देणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापैकी कोणाला संधी की…?
खेड बाजार समितीच्या सभापतिपदासाठी नागरिकांच्या चर्चेतून आमदार दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कैलास लिंभोरे, जयसिंग भोगाडे,हनुमंत कड, अशोक राक्षे,रणजित गाडे यांच्यासह महिलेला संधी दिली तर कमल कड यांची नावे चर्चेत आहेत. तर विरोधकांची खेळी काय असणार याबाबतही चर्चा होत आहेत. सर्व पक्षीयकडून आमदार मोहिते गटाचे संचालक खेचण्यात त्यांना यश मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





