कारवाई करण्याची नागरिकांची मागणी चाकण – चाकण औद्योगिक वसाहतमधील कारखान्यात काम करणार्या कामगारांना रोजची ने-आण करणार्या खासगी बसेस तसेच एसटी, पीएमपीएल आणि शाळेच्या बस चालकांच्या बेशिस्तपणामुळे पुणे – नाशिक आणि तळेगाव – चाकण महामार्गासह औद्योगिक क्षेत्रात जाणार्या प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडीमध्ये अजून भर पडत आहे, अशा बस चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चाकण औद्योगिक वसाहतमधील कंपन्यांमधील कामगारांना ने-आण करण्यासाठी मोठ्या संख्येने खासगी बस तसेच पीएमपीएल, एसटी बस आणि शाळांच्या बसेस चालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. कामगार वाहतूक बस पहाटे साडे चार- पाच वाजल्यापासून सुरू होतात. त्या दुपारी दोन ते संध्याकाळी चार वाजल्यानंतर मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात. तसेच सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास शाळेच्या बस रस्त्यावर येतात. खासगी बस तसेच पीएमपीएल आणि एसटी बस अशा बसेस मुख्य महामार्गावर प्रवासी, कामगार किंवा विद्यार्थी उतरवताना आणि घेताना बसचालक हा रस्ता फक्त आपल्याच वापरासाठी असल्याच्या अविरभावात असतात. तोच आडमुठेपणा करत बस रस्त्याच्या कडेला उभ्या न करता मध्यावर उभ्या केल्या जातात. यामुळे मागील वाहनांना पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा मिळत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. कंपनीतील कामगारांच्या वाहतूक करणार्या खासगी बसेस पुणे नाशिक आणि तळेगाव चाकण महामार्गासह चाकण – वासुली फाटा – आंबेठाण, महाळुंगे, खालुंब्रे, कुरुळी, आळंदी फाट्यासह एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यांवर कुठेही या बससेचे थांबे आहेत. या मार्गावर इतर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. अशातच कंपनीच्या बस बेशिस्तपणे थांबल्यानंतर मागे वाहनांच्या रांगा लागल्याचे नेहमीचेच चित्र असते. कंपनी भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला तर दूर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. दरम्यान, या बस उभ्या राहण्यासाठी मुख्य चौक, वर्दळीच्या ठिकाणे वगळून जागा निश्चित कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कंपन्यांमधील कामगारांना ने-आण करणार्या आणि स्कुल बसेस या खासगी ठेकेदारांकडून पुरवण्यात आल्या आहेत. यामुळे बसेसवरील चालकांकडून मनमानीपणा आणि दादागिरी वेळ प्रसंगी किरकोळ हाणामारी केली जाते. वाहतूक कोंडी झाल्यावर हे बस चालक डबल ट्रिपल लेनकरून बसेस पुढे काढत असतात. समोरून येणार्या वाहनांना जागा मिळत नाही. मग सगळीच वाहने अडकल्याने मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.