पुणे जिल्हा : नवीन मुळा मुठा कालव्याला पाणी आल्याने गव्हाच्या पेरण्या जोरात

सोरतापवाडी : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, सोरतापवाडी, वळती, शिंदवणे, तरडे, म्हातोबाची आळंदी, उरुळी कांचन इत्यादी गावातील शेतकरी दरवर्षी कांदा लागवड व गहु पेरणी करत असतात पण दोन महिन्यापेक्षा जास्त नवीन मुळा मोठा कालवा बंद असल्यामुळे शेतकर्यांची हक्काची पिके जातात की काय, अशी शेतकर्यांना काळजी लागली होती; पण नवीन मुठा कालव्याला पाणी आल्यामुळे शेतकर्यांची चिंता मिटली असून कांदा लागवड व गहू पेरण्या जोरात चालू झाल्या आहेत.
हवेली तालुक्याला संजीवनी देणारा नवीन मुळा-मुठा कालवा व जुना कालवा कोरडा पडल्यामुळे कांद्याच्या लागणी कोळंबल्या होत्या. शेतकरी नवीन मुळा-मुठा कालव्यात पाणी येण्याची वाट पाहत होते.. तसेच गव्हाची सुद्धा आता पेरणी चालू होईल पण कालवा कोरडा पडल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
त्यातच अनेक गावात शेतीला पाणी टंचाई जाणवू लागली होती तसेच पिकाला पाणी कमी पडू लागल्यामुळे कांदयाच्या लागणी थांबल्या आहेत. लवकरात लवकर नवीन कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी पूर्व हवेलीतील शेतकर्यांनी केली होती.
कांद्याच्या लागणी व गव्हाच्या पेरणीसाठी पाण्याची आवश्यकता असुन त्यात नोव्हेंबरचा पंधरवडा संपत आला तरी अजून कालव्यात पाणी न गेल्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा अडचणीत आला होता. तसेच अनेक गावातील विहिरी व बोअरवेल मधील पाण्याची पातळी खोल गेली होती. कालवे आटल्याने पूर्व हवेलीतील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली होती. आता नवीन मुळा मोठा कालव्यात पाणी आल्यामुळे कांद्याच्या लागणी गव्हाची पेरणी व रब्बी पिकासाठी फायद्याचे असून शेतकर्यांना एक हक्काचे पीक घेता येईल.
-भाऊसाहेब चौधरी, प्रगतशील शेतकरी सोरतापवाडी





