पुणे जिल्हा : जेजुरी बाजारातील असुविधा दूर करू

मुख्याधिकारी इंगोले यांचे लेखी आश्वासन
जेजुरी – जेजुरी बाजारतळामध्ये कचरा संकलित करण्यासाठी कायमस्वरूपी एक ट्रॉली उभी करण्यात येणार आहे. बाजारचे असुविधा निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. स्वच्छतागृहांची दुरुस्ती केली जाईल, आवश्यक तेथे मुरुमीकरण करून पटांगणातील गवत साफ करून धुरळणी, फवारणी नियमित करण्यात येईल. लवकरच बाजारओटे वितरित करण्यात येतील, असे लेखी आश्वासन जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप जगताप व कार्यकर्त्यांना दिले आहे.
गेली काही महिन्यांपासून जेजुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजारतळामध्ये प्रचंड असुविधांचा सामना शेतकर्यांना करावा लागत आहे.स्वच्छता गृहांचा अभाव, दलदल, घाणीचे साम्राज्य, भटक्या प्राण्यांचा वावर त्यातच बाजारतळ अपुरा पडत असल्याने शेतकर्यांना आपला माल रस्त्याच्या कडेला बसून विकावा लागत आहे.
याबाबत दैनिक प्रभातमधून दोन वेळा वृत्त प्रसारित झाल्यानंतर संभाजी ब्रिगेड आणि किसान क्रांती मोर्चाच्या वतीने नगरपालिकेला ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यामध्ये शेतकर्यांकडून केला जाणारा बाजार कर रद्द करण्यात यावा. शेतमाल विकणार्या व्यापारी असो वा शेतकरी त्यांना सोयीसुविधा मिळाव्यात अन्यथा आंदोलन करणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते.
याबाबत नगरपालिका कार्यालयात मंगळवारी (दि. 3) झालेल्या बैठकीत शहराध्यक्ष संदीप जगताप, मनसे तालुकाप्रमुख उमेश जगताप, अनिता नरोडे, तानाजी काळाणे, सागर खोमणे, सुहास खोमणे, सचिन शिंदे, सलीम तांबोळी, गोरख रोमण आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी इंगोले यांनी चार दिवसांत असुविधाचे निवारण करण्यात येणार असून ठिय्या आंदोलन करू नये, असे लेखी आश्वासन दिले .





