पुणे जिल्हा : अडीअडचणीत धावणारा खासदार आम्हाला हवाय -सुभाष भुजबळ

आढळराव रात्री अपरात्रीही फोन उचलतात
चाकण – माजी खासदारी शिवाजीराव आढळराव पाटील हे रात्री अपरात्रीही फोन उचलतात, अडचणी सोडवतात. अडीअडचणीत धावणारा खासदार आम्हाला पाहिजे त्यासाठी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या पाठीशी आम्ही राहणार असल्याचे मेदनकरवाडीचे माजी उपसरपंच सुभाष भुजबळ यांनी सांगितले.
चाकणच्या मेदनकर वाडी येथे प्रचारदौर्यानिमित्त आढळराव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. येथे रामनवमी ते हनुमान जयंतीनिमित्त खंडोबा देवस्थान येथे सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहात देखील त्यांनी उपस्थिती लावली. त्यांच्यासमवेत आमदार दिलीप मोहिते पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, राष्ट्रवादी खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, शिवसेना तालुका प्रमुख राजुशेठ जवळेकर, भाजप तालुका अध्यक्ष शांताराम भोसले,
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, राष्ट्रवादी खेड तालुका उपाध्यक्ष शुभम बालघरे, आदींसह महायुतीच्या विविध पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सभापती, उपसभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते यांनी या दौर्याला उपस्थिती लावली होती.
वकील बार असोसिएशनला भेट..
या दौर्यात आढळराव यांच्यासह सहभागी मान्यवरांनी राजगुरुनगर येथील वकील बार असोसिएशनला भेट दिली. त्यावेळी बोलताना आढळराव म्हणाले की, असोसिएशनकडून अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट व्हावा यासाठीची मागणी आहे. मी निवडून आल्यानंतर हा कायदा करण्यासाठी प्राधान्यक्रमाने प्रयत्न करील. उपस्थित वकिल आणि सदस्यांशी संवाद साधत त्यांनी समस्या जाणून घेतल्या.





