Pune District : कोंढापुरीच्या तलावात पाणी दाखल शेतकरी, नागरिकांत समाधान

शिक्रापूर : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील नागरिकांसाठी महत्वाचे असलेल्या पाझर तलावात चासकमान धरणातील पाण्याचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोंढापुरी येथील पाझर तलाव ३.७५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमतेचा असून हा पाझर तलाव १५ दिवसांपूर्वी कोरडा पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तलावातील पाण्याला ठिकठिकाणी डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर कोंढापुरी, खंडाळे, निमगाव म्हाळुंगी, कासारी, गणेगाव खालसा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना या पाझर तलावातील पाण्याचा उपयोग होत आहे.
काही शेतकरी तलावातील डबक्यांतील पाणी शेतातील पिकांना देवून शेतातील पिके जगविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. नुकतेच कोंढापुरी पाझर तलावात चासकमान धरणातील पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.





